दैनिक स्थैर्य | दि. १२ ऑक्टोबर २०२३ | बारामती |
बारामती येथील रागिणी फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने दरवर्षी गौरी गणपती सणानिमित्त गौरी आरास स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी देखील रागिणी फाऊंडेशन व लीनेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने गौरी आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्याबरोबरच सातारा जिल्ह्यातील स्पर्धकही सहभागी झाले होते. पर्यावरणपूरक संकल्पना घेऊन गौरी आरास व समाज प्रबोधनपर संदेश असा स्पर्धेचा निकष होता. हा निकष लक्षात घेऊन स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांनी वेगवेगळ्या संकल्पना टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचा वापर करून राबवल्या होत्या. आणि स्पर्धेसाठी आपला सहभाग नोंदवला होता. ४० स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते.
या स्पर्धेत अनुक्रमे प्रथम क्रमांक – अमृता तंटक (सिद्धेश्वर कुरोली, खटाव), द्वितीय क्रमांक- प्राची गोडसे (बारामती), तृतीय क्रमांक – श्वेताली भिले (डोर्लेवाडी), स्वाती सस्ते (माळेगाव) व काजल घोलप (सोमेश्वरनगर) यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आले. तसेच विशेष आकर्षणासाठी सोनम गाडे (बारामती), वैशाली टाळकुटे (बारामती), सोनाली गायकवाड (सोमेश्वरनगर), वर्षा थोरात (माळेगाव), अंबिका माने (सोनगाव) यांना पारितोषिके देण्यात आली.
आध्यात्मिक परंपरेबरोबरच महिलांच्या कलाकृतीला जास्तीत जास्त वाव मिळावा, त्यांच्या कलाकृतीतून समाज प्रबोधनात्मक विचार मिळावा, यादृष्टीने गौरी आरास स्पर्धेचे आयोजन दरवर्षी केले जात असल्याचे रागिणी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा राजश्री आगम यांनी सांगितले. दिवसेंदिवस आपल्या गौरी आरासमधून विविध प्रबोधनात्मक आरास केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावर्षी महिलांनी चांद्रयान मोहिम, जैविक शेती, पंढरपूरच्या वारीचे आध्यात्मिक महत्त्व, स्त्री कर्तृत्वाचा जागर, जगाचा पोशिंदा शेतकरी राजा, जेजुरी गड अशा वैविध्यपूर्ण आरास केल्या होत्या.
या स्पर्धेसाठी राधिका साडी सेंटर आणि एल. मी. सलोन यांचे प्रायोजकत्व लाभले. रागिणी फाऊंडेशनच्या सदस्य ऋतुजा आगम, घनश्याम केळकर, साक्षी आंबेकर, पूजा बोराटे, सुजाता लोंढे, लीनेस राधिका घोळवे, लिनेस उज्ज्वला शिंदे यांचे योगदान लाभले.
हा कार्यक्रम मल्हार क्लब येथे संपन्न झाला.