फोडजाई मंदीराजवळ वृद्धास जखमी करून जबरी चोरी करणार्‍या सराईतांना अटक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २ जुलै २०२१ । सातारा । फोडजाई मंदिरालगत शतपावली करत असलेल्या वृद्धास जखमी करून त्याच्याकडून मोबाईल आणि घड्याळ अशा ऐवज लुटून नेणार्‍या सराईत चोरट्यंना एलसीबीच्या पथकाने रेवडी, ता. कोेरेगावात छापा मारून अटक केली. अतिक्रमण मुंजेश उर्फ विज्या काळे रा. रेवडी, ता. कोरेगाव, नकुल छगन काळे रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव अशी संशयितांची नावे आहेत. दरम्यान, या छाप्यात पोक्सोप्रकरणात फरार असलेला सराईत आरोपी अधीक्षक उर्फ अध्यक्ष पितांबर शिंदे रा. चिंचणेर वंदन ता. सातारा देखील पोलिसांच्या तावडीत सापडला.
याबाबत माहिती अशी, फोडजाई मंदिराशेजारी पी.डब्ल्यु.डी ऑफिससमोर दि. 26 जून रोजी दहा वाजण्याच्या सुमारास शतपावली करत असणार्‍या जेष्ठ नागरीकास दोन अज्ञातांनी पाठीमागून धक्का मारून जमिनीवर पाडून घड्याळ व मोबाईल हिसकावून घेवून मोटारसायकलवरुन पळून गेले होते. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी एलसीबीच्या तपास पथकाने घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाची पाहणी करुन सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक माहितीचे विश्‍लेषण करुन तसेच गोपनीय माहिती प्राप्त केली असता पथकास आरोपी हे रेवडी, ता. कोरेगाव येथील असून पोलीस अभिलेखावरील असल्याचे समजले.

त्या अनुषंगाने एलसीबीच्या पथकाने रेवडी येथे आरोपींच्या घरावर छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले. आरोपी हे खुन, दरोडा जबरी चोरी, तसेच घरफोडीच्या गुन्ह्यातील अभिलेखावरील अट्टल गुन्हेगार असल्याने ते तपासकामी मदत करत नव्हते. परंतु, तपास पथकातील अधिकारी व अमलदार यांनी नमुद दोन संशयीतांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे कसोशीने व कौशल्यपुर्ण पद्धतीने विचारपूस केली केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. याशिवाय त्यांनी सातारा सौनिक स्कुल व मेढा पोलीस ठाणे हद्दीतील आंबेघर येथील चंदनाची झाडे चोरी केल्याची कबुली दिली. त्याबाबतही सातारा शहर पोलीस ठाण्यात व मेढा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. याशिवाय सातारा तालुका पोलीस ठाण्यात बालकांचा लैंगिक अत्याचारप्रकरणी फरार आरोपीलादेखील रेवडी येथून ताब्यात घेवून पुढील तपासकामी सातारा तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सुचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, पोलीस उप-निरीक्षक मधुकर गुरव, सहायक पोलीस उपनिरीक्षक उत्तम दबडे, तानाजी माने, पोलीस हवालदार सुधीर बनकर, संतोष सपकाळ, संतोष पवार, अतिष घाडगे, विजय कांबळे पोलीस नाईक शरद बेबले, नितीन गोगावले, मंगेश महाडीक, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, रवि वाघमारे, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, अर्जुन शिरतोडे, निलेश काटकर, गणेश कापरे, पोलीस कॉन्स्टेबल विक्रम पिसाळ, विशाल पवार, सचिन ससाणे, रोहीत निकम, धीरज महाडीक, वैभव सावंत, चालक पोलीस नाईक गणेश कचरे, विजय सावंत महिला पोलीस नाईक मोना निकम, महिला पोलीस कॉन्स्टेबल तनुजा शेख, माधवी साळुखे यांनी ही कारवाई केली आहे.


Back to top button
Don`t copy text!