रस्त्याकडेच्या चार्‍या त्या रस्त्याच्या संरक्षक असल्याने त्यांचे अस्तित्व जपले पाहिजे  


 

स्थैर्य, फलटण दि.२०: रस्त्याकडेला असलेल्या चार्‍या, त्या रस्त्यांच्या संरक्षक असून या चार्‍यांमुळे रस्ते सुरक्षीत राहुन त्यांचे आयुष्य वाढत असल्याचे लक्षात घेऊन संबंधीत शासकीय यंत्रणेने रस्ता करताना त्याच्या दोन्ही बाजूच्या चार्‍या व्यवस्थित तयार केल्या पाहिजेत अशी अपेक्षा गिरवी, ता. फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते भुपेश बुवासाहेब कदम यांनी व्यक्त केली आहे.


चार्‍या नसल्याने गिरवी-निरगुडी रस्त्याची दुरावस्था

गिरवी-निरगुडी रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या चार्‍या आज अस्तित्वात राहिल्या नसल्याने सध्याच्या पावसाळ्यात या रस्याची अत्यंत दुरावस्था झाली असून पाणी साठल्याने जागोजागी खड्डे पडत असून सततच्या वाहतुकीने ते मोठे होऊन रस्ता खराब होत आहे. 

गिरवी-निरगुडी रस्त्यासारखी स्थिती तालुक्यातील नव्हे संपूर्ण राज्यातील ग्रामीण रस्त्यांची असल्याचे भुपेश कदम यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

मैल कुली संकल्पना मोडीत निघाली

सार्वजनिक बांधकाम किंवा जिल्हा परिषद बांधकाम विभाग पूर्वी रस्ता करताना दोन्ही बाजूच्या चार्‍या तयार करण्याला प्रधान्य देत असत इतकेच काय प्रत्येक रस्त्यासाठी मैल कुली असे सदर व्यक्ती त्यांना नेमून दिलेल्या रस्त्याकडेच्या या चार्‍या सुस्थितीत ठेवणे, रस्त्याला कोठे खड्डा पडला तर त्यावर लगेच मुरुम टाकून त्याची डागडुजी करणे, पावसाळ्यात एखाद्या ठिकाणी पाणी साठून राहिले तर ते काढून देऊन पाण्यामुळे रस्ता खराब होणार नाही याची दक्षता घेत असत, मैल कुली रस्त्यावर आढळत नाही त्याऐवजी सदर रस्त्याच्या ठेकेदाराने रस्ता पूर्ण झाल्यापासून एक दोन वर्षे किंवा निर्धारित कालावधी पर्यंत सदर रस्ता सुस्थितीत राहिल यासाठी खबरदारी घेण्याचे बंधन त्याच्यावर घालण्यात आले आहे. राष्ट्रीय व राज्य महामार्गाबाबत ही जबाबदारी 6 वर्षांपर्यंत असल्याचे भुपेश कदम यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

शासनाने ही संकल्पना सोडून दिली असे आजचे चित्र

रस्त्याकडेच्या चार्‍या अलीकडे एकतर लगतचा शेतकरी अतिक्रमण करुन मोडून टाकत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले आहे, त्याचप्रमाणे या चार्‍यांमुळे रस्त्याचे आयुष्य वाढणार असल्याने रस्त्याच्या कामाबरोबर चार्‍या दुरुस्त करुन त्याचे अस्तित्व जपण्याची गरज रस्ते बांधकाम क्षेत्रातील शासकीय यंत्रणा, तेथील रस्त्यांची देखभाल करणारे अधिकारी, त्या भागातील सर्वसामान्य माणूस विसरुन गेला असल्याने आज या चार्‍यांचे अस्तित्वच राहिले नाही, त्यासाठी शासनाने रस्त्याच्या कामाबरोबर त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या चार्‍या तयार करुन त्या सुस्थितीत ठेवण्याला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे भुपेश कदम यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

खर्च प्रचंड वाढल्याने शासन हतबल : लोकांची जबाबदारी वाढली


वाढती लोकवस्ती, सर्व प्रकारच्या वाहनांचा वाढता वापर, वाहनांची वाढलेली अमर्याद संख्या विचारात घेता त्याप्रमाणात रस्ते वाढले नाहीत, असलेले रस्ते त्याप्रमाणात रुंद झाले नाहीत त्याचबरोबर नवीन रस्ते निर्मिती, जुन्या रस्त्यांची दुरुस्ती यासाठी होणारा खर्च गेल्या 10/15 वर्षात जवळपास 10 पट वाढला असल्याने नवीन रस्त्यांची निर्मिती व जुन्या रस्त्यांची दुरुस्ती याकडे विशेषतः ग्रामीण भागात निधीच्या पुरेशा उपलब्धते अभावी पाहिले जात नसल्याने आता ग्रामीण भागातील रस्त्यांची जपणूक करण्याचे काम काही अंशी त्या त्या भागातील ग्रामस्थांना, स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वीकारावे लागेल तरच ग्रामीण भागात रस्ते सुस्थितीत राहु शकतील ही वस्तूस्थिती असल्याचे भुपेश कदम यांनी स्पष्ट केले आहे.

पथ कर चांगली संकल्पना : अंमलबजावणीत अतिरेक झाला

निधीच्या पुरेशा उपलब्धतेबाबत शासनाने पथ कर आकारणीची चांगली संकल्पना स्वीकारली होती परंतू त्याची अंमलबजावणी करताना काहीसा अतिरेक झाला, त्यातून चुकीची कामकाज पद्धती हाताळली गेल्याने त्याला लोकांचा विरोध झाला त्यामध्ये काही सुधारणा करुन त्यामार्गाने निधी उभारण्याची पारदर्शक योजना पुढे आणली गेली पाहिजे अन्यथा यापुढे शासन रस्त्यांसाठी फार मोठा निधी देऊ शकेल असे वाटत नाही, त्यादृष्टीने विचार झाला पाहिजे अशी अपेक्षा भुपेश कदम यांनी व्यक्त केली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!