दैनिक स्थैर्य | दि. २७ जून २०२४ | फलटण |
कापशी बिबी येथील शरयू अॅग्रो इंडस्ट्रीजच्या आगामी गळीत हंगामाच्या मिल रोलरचे पूजन कार्यकारी संचालक श्री. युगेंद्रदादा पवार यांच्या हस्ते विधीवत करण्यात आले.
शरयू कारखान्याच्या आगामी २०२४-२५ च्या गळीत हंगामासाठी मशिनरी दुरुस्ती व देखभालीची कामे प्रगतीपथावर असून यंदाचा गळीत हंगाम निर्धारित वेळेत सुरू होणार आहे. कारखान्याच्या मशिनरीची योग्य ती देखभाल करण्यासाठी प्रयोजन करण्यात आले असून हंगामपूर्व कामांसाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यानुसार संबंधित अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
कारखाना कार्यस्थळावर वाहतूक यंत्रणा व मजूर यांचे करार करण्यास प्रारंभ झाला असून त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
फलटण-सातारा रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर असून गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार आहे. वाहनमालकांनी आपल्या यंत्रणेचे जास्तीत जास्त करार शरयूला करावेत, असे आवाहन श्री. युगेंद्रदादा पवार यांनी केले आहे.
शरयूने गत हंगामात जिल्ह्यात सर्वोत्तम दर दिला असून वाई, कोरेगाव, खंडाळा, खटाव, माळशिरस, इंदापूर, बारामती, पुरंदर व भोर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण केले आहे.
कार्यक्रमास संचालक अविनाश भापकर, सर्व विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.