स्थैर्य, दि.५: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाैर्यगाथा कानावर पडत गेल्या आणि सातत्याने
प्रेरणा मिळत गेली. याच स्फूर्तिदायी कथेवरून साडेचार वर्षीय रिदम गजानन
टाकळेने (रा. ग्रामसेवक काॅलनी, नगर राेड, बीड)पाच हजार ४०० फूट उंचीचे
कळसुबाई शिखर गाठण्याचा पराक्रम केला. त्याने हे अंतर तीन तास ३८ मिनिटांत
सर करून शिखरावर तिरंगा उंचावला. बीड जिल्ह्यातील साडेचार वर्षीय
चिमुकल्याने प्रचंड ऊर्जेतून सर केलेले शिखर यशस्वीपणे त्याच उत्साहातून
परतीचा प्रवासही पूर्ण करत शारीरिक क्षमतेचा परिचय करून दिला. बालवाडीत
शिक्षण घेत असलेल्या रिदमने शिखरावर पाेहाेचताच तिरंगा झेंडा फडकवला.
नगर
जिल्ह्यातील कळसुबाई शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. त्यामुळे
गिर्यारोहकांच्या दृष्टीने कळसुबाई शिखराला एक वेगळे महत्त्व आहे.
चिमुकल्या रिदमने २९ नाेव्हेंबर २०२० राेजी सकाळी ७.५५ वाजता कळसुबाई
शिखरावर चढण्यास सुरुवात केली. नंतर न थांबता त्याने सकाळी ११.३३ वाजता
शिखर गाठले.
साडेतीनव्या वर्षांपासून माेहिमेवर
चिमुकल्या
रिदमला वडील गजानन हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाैर्याविषयीचा इतिहास
सांगत असतात. साेशल माध्यमातून किल्ल्यांची माहिती, कसे सर करायचे व
त्यांचे कार्य अशी माहिती ते देत असतात. यातूनच रिदमला िकल्ल्यांविषयीची
आवड निर्माण झाली असून ताे किल्ले, गड, डाेंगर चढण्यासाठी उत्सुक असताे.
यापूर्वीही त्याने ३ वर्षे सात महिन्यांचा असताना रायगड, राजगड, लाेहगड व
सुधागड हे किल्ले सर केलेले असल्याचे वडील गजानन टाकळे यांनी ‘दिव्य
मराठी’शी बाेलताना सांगितले.
२५ डिसेंबरला सर करणार हरिश्चंद्र गड
रिदम
टाकळे हा येत्या २५ डिसेंबरला हरिश्चंद्र गड (ता. अकाेले, जि. नगर) सर
करणार आहे. रिदम टाकळेने कळसुबाई शिखर सर केलेल्या या विक्रमाची नाेंद
इंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये व्हावी, अशी अपेक्षा वडील गजानन टाकळे यांनी
व्यक्त केली आहे.