दैनिक स्थैर्य | दि. १६ सप्टेंबर २०२४ | फलटण |
रक्षक रयतेचा न्यूज आणि चंदूकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य गौरी सजावट स्पर्धा संपूर्ण सातारा जिल्हा आणि बारामती, इंदापूर, माळशिरस, पुरंदर तालुका या क्षेत्रासाठी मर्यादित ठेवण्यात आली होती. यात पाच बक्षीस ठेवण्यात आली होती. गौराई सजावट स्पर्धेमध्ये सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याच्या गिरवी प्रभागातील महाराष्ट्रातील प्रथम फळांचे गाव बनलेल्या ‘धुमाळवाडी’ गावामधील नारीशक्ती महिला ग्रामसंघाच्या सदस्य व कन्यारत्न महिला बचत गटाच्या अध्यक्षा, सासकल गावच्या माहेरवासीन व धुमाळवाडीच्या सासरवासीन रेश्मा पवार यांनी प्रथम क्रमांक मिळवला. प्रथम क्रमांकासाठी त्यांना एक सोन्याची नथ, प्रशस्तीपत्रक व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. या त्यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
या स्पर्धेत त्यांनी फळांचे गाव म्हणून फळे विकणारी गौराई, फळ लागवड करणारी गौराई, फळबागा खुरपणारी गौराई, फळबागांचे संगोपन करणारी गौराई अशा सुंदर कल्पनेने रेश्मा पवार यांनी गौराईची सजवट केल्याबद्दल त्यांना प्रथम क्रमांकाने गौरवण्यात आले.
सर्व महिला स्वयंसहाय्यता बचत गट, कृषी क्षेत्रातील सर्व प्रशासकीय अधिकारी, कुटुंबीय, त्यांचे पती नितीन पवार, आई – वडील, बंधू राहुल मुळीक, दीर व ग्रामस्थ तसेच सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.