स्थैर्य, नागपूर दि,२६ : देशाच्या अर्थव्यवस्थेत पशुधनाचे महत्त्वाचे योगदान आहे. पशुधनावर वेगवेगळ्या संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. नुकतेच राज्यात लम्पी या त्वचारोगाने डोके वर काढले होते. ते पाहता भविष्यात पशुधनाची उत्पादकता वाढविण्यासाठी रोगनिदानशास्त्रावर (पॅथॉलॉजी) अद्यावत संशोधन गरजेचे असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी आज केले.
महाराष्ट्र पशुवैद्यक आणि मत्स्यसंवर्धन विद्यापीठ (माफसु) येथे ऑनलाईन आंतरराष्ट्रीय पशुवैद्यक रोगनिदानशास्त्रावर आधारीत दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माफसुचे कुलगुरू डॉ. ए. एम पातुरकर, संशोधन संचालक डॉ. एन. व्ही. कुरकुरे, निबंधक डॉ. सोमकुंवर, डॉ. एस. बी. कविटकर प्रामुख्याने उपस्थित होते.
पशुधन व कुक्कुटपालनातील वाढत्या रोगावरील नियंत्रणात पशुवैद्यक रोगनिदानशास्त्राची भूमिका या विषयावरील (role of veterinary pathology in controlling emerging and re-emerging diseases of livestock and poultry : an one health approach) आधारीत कार्यशाळेत आंतरराष्ट्रीय चर्चासत्र होत आहे. रोगनिदानशास्त्रातील व पशुवैद्यक क्षेत्रातील संशोधक व तज्ञ मंडळी या चर्चासत्रात सहभागी होतील.
कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी लसीवर जगात संशोधन सुरू आहे. मानवासोबत अन्य प्राणी व पशुधनावरही बदलत्या वातावरणाने अनेक नवीन रोगांचा उगम होत आहे. नुकताच राज्यातील पशुधनावर लम्पी नावाचा आजार आढळून आला होता. त्यावर वेळेवर उपचार केल्याने तो लवकर नियंत्रणात आला. मात्र त्याने गायी, म्हशी या दुधाळ जनावरांची उत्पादकता खालावली होती. अशावेळी पशुवैद्यक व संशोधकांकडून अद्ययावत संशोधनाची व लसनिर्मितीची अपेक्षा असल्याचे श्री. केदार म्हणाले, यापुढे पशुधनावरील संसर्गजन्य आजारांवर लसनिर्मितीवर लक्ष केंद्रीत करण्याची सूचनाही त्यांनी केली.
माफसुने संशोधनाला प्राधान्य दिले असून कोविडमध्येही विद्यापीठाने भूमिका बजावली आहे. आयसीएमआरच्या सहयोगाने विद्यापीठात वन हेल्थ सेंटर सुरू केले आहे. पशुधन, कुक्कुटपालनांसह संलग्न शाखांमध्ये माफसुद्वारे काम करणे सूरू असल्याचे कुलगुरू डॉ. ए. एम. पातुरकर यांनी सांगितले.
या कार्यशाळेत नवी दिल्लीवरून आयसीएआरचे उपसंचालक डॉ. बी. एन. त्रिपाठी, सदस्य प्रा .ए. के. श्रीवास्तव यांच्यासह देश विदेशातील 350 हून जास्त विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक देखील यात सहभागी झाले होते.
रोगनिदानशास्त्रात उत्तम काम करणाऱ्या संशोधकांना यावेळी आभासी पद्धतीने सन्मानित करण्यात आले त्यामध्ये के. पी. सिंग (दिल्ली), एस. के. मुखोपाध्याय (बंगाल), डॉ. आंनदकुमार, डॉ. एन. व्ही कुरकुरे यांचा गौरव करण्यात आला. माहिती पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन कार्यक्रमाचे स्वागतपर भाषण डॉ .एस. बी. कविटकर यांनी तर प्रस्तावना डॉ.ए.पी. सोमकुवर यांनी केली. संचलन डॉ. माधुरी हेडाऊ यांनी तर आभार डॉ. एन. व्ही कुरकुरे यांनी व्यक्त केले.