शरद पवारांनी कृषी कायद्यासंबंधी व्हायरल झालेल्या जुन्या पत्रावर सोडले मौन


 

स्थैर्य, दि.२८: आज शेतकरी विधेयकांच्या विरोधात
देशभरात बंद पाळला जात आहे. याला महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचाही
पाठिंबा आहे. दरम्यान युपीए सरकारच्या काळात केंद्रीय कृषीमंत्री पदाचा
कार्यभार सांभाळत असताना शरद पवार यांनी कृषी कायद्यात मोठ्या बदलाची गरज
व्यक्त करत अनेक राज्यांना पत्र लिहिले होते. शेतकरी आंदोलनाच्या
पार्श्वभूमीवर हे पत्र व्हायरल झाले होते. यावरुन माजी मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीसांनी या पक्षांची भूमिका दुटप्पी असल्याचे म्हणत टीका केली
होती. आता या पत्रावर शरद पवारांनी मौन सोडले आहे.

आज
शरद पवार केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेण्यासाठी
दिल्लीत पोहोचले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी पुरंदर
विमानतळाबाबत ही भेट घेतल्याचे सांगितले. यावेळी व्हायरल पत्राच्या
प्रश्नावर शरद पवारांनी भाष्य केले आहे. पवार म्हणाले की, ‘ज्यांनी पत्राचा
हवाला दिला आहे त्यांनी ते थोडे नीट वाचले असते तर त्यांचा वेळ वाचला
असता. कायद्यातील सुधारणांसंदर्भात पत्र लिहिण्यात आले होते. यामध्ये
कोणतंही दुमत नाही. मात्र आज जे तीन नवे कृषी विधेयक आणले आहेत त्यात याचा
उल्लेख दिसत नाही. त्यामुळे आमचे नाव घेऊन आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न
केला जात आहे’ असे पवार म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते फडणवीस

‘भारत
बंद’च्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी
यूपीए सरकारमध्ये कृषिमंत्री असताना पाठवलेले बाजार समितीच्या माॅडेल
अॅक्टबाबतचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल करून भाजपच्या आयटी सेलने
राष्ट्रवादीची चांगलीच कोंडी केली होती. बाजार समित्या मोडीत काढण्यास व
शेतमाल नियमनमुक्तीसाठी पवार प्रयत्नशील होते हे भाजपने दाखवून
दिले.दरम्यान, पवार यांचे जुने पत्र सकाळी सोशल मीडियावर व्हायरल होताच
सायंकाळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कृषी कायद्यांबाबत पवार
दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप केला होता.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!