दैनिक स्थैर्य | दि. २३ जुलै २०२३ | फलटण |
उपळवे (ता. फलटण) व परिसरातील गावांतील बौध्द समाजातील महार वतनी जमिनींचा जबरदस्तीने घेतलेला ताबा व अतिक्रमणे त्वरित हटवून मूळ मालकांना त्या देण्यात याव्यात व या प्रकरणातील सुरेश गंगाराम लांभते याच्यावर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी उपोषण करणार असल्याचे निवेदन कामगार संघर्ष संघटना, फलटण यांच्यातर्फे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे सनी काकडे, हरिष काकडे, महादेव गायकवाड, मंगेश आवळे आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, फलटण तालुक्यातील उपळवे, दालवडी, वाठार निंबाळकर, विंचुर्णी, नांदल, सोमंथळी, सस्तेवाडी, सांगवी, सुरवडी, काळज या गावांसह इतर गावात असलेल्या महार वतनी जमिनी जबरदस्तीने, सावकारकीने, फसवणूक करून खंडाने घेतलेल्या आहेत. या जमिनी मूळ मालकांना परत देण्यात याव्यात, अशी आमची मागणी आहे.
या जमिनी अतिक्रमण करणार्यांनी आपल्या प्रशासकीय पदाचा गैरवापर करून बळकावल्या आहेत. त्यांनी जमिनींच्या मूळ मालकांनाच गावाबाहेर हाकलून या जमिनी हस्तगत केल्या आहेत. या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर मोक्काअंतर्गत कारवाई करावी.
या प्रकरणी पाच दिवसात प्रशासनाने जर कारवाई केली नाही तर कामगार संघर्ष संघटनेतर्फे आंदोलन छेडण्यात येईल व उपोषण करण्यात येईल, असा संघटनेच्या पदाधिकार्यांनी दिला आहे.