निंभोरे सरपंच कांचन निंबाळकर यांच्या विरुद्धचा अविश्वास ठराव फेटाळळा; सरपंच भाजपमध्ये दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ४ मार्च २०२३ | फलटण | निंभोरे ता. फलटण गावच्या विद्यमान सरपंच कांचन निंबाळकर यांच्या विरोधात इतर सदस्यांनी मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप करीत दाखल केलेला अविश्वास ठराव फेटाळण्यात आल्यानंतर त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करीत राजे गटाला धक्का दिला आहे. सरपंच कांचन निंबाळकर या इतर ग्रामपंचायत सदस्यांना अपमानास्पद वागणूक देत असल्याचे तसेच कोणत्याही कामात सदस्यांना विचारात न घेता कामे करीत असल्याच्या मुद्द्यांच्या विरोधात अविश्वास ठरावाची मागणी करण्यात आली होती, तो अविश्वास ठराव ६ विरुद्ध ३ अशा मताधिक्याने फेटाळण्यात आला.

आज शुक्रवार दि. ३ मार्च रोजी दुपारी ३ वाजता तहसीलदार समीर यादव यांच्या अध्यक्षतेखाली निंभोरे ग्रामपंचायत कार्यालयात सर्व सदस्यांच्याची विशेष सभा घेण्यात आली, त्यावेळी अविश्वास ठरावाबाबत गुप्त मतदान घेण्यात आले, त्यामध्ये सर्व ९ सदस्यांनी मतदान केले, अविश्वास ठरावाच्या बाजूने ६ तर विरोधी ३ सदस्यांनी मतदान केले, मात्र नियमाप्रमाणे ९ पैकी ७ सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले असते तर अविश्वास ठराव मंजूर झाला असता तथापि प्रत्यक्षात ६ सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने ठराव फेटाळला असल्याची माहिती तहसीलदार समीर यादव यांनी दिली. या मतदान प्रक्रिये वेळी मंडलाधिकारी जोशी, ग्रामसेवक एम. यु. शेलार, सहाय्यक पोलीस फौजदार विलास यादव उपस्थित होते.

अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी ७ सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान करण्याची आवश्यकता होती, त्याप्रमाणे अविश्वास ठराव दाखल करताना एकूण ९ सदस्यांपैकी ७ सदस्यांनी ठराव दाखल केला होता, मात्र प्रत्यक्षात मतदान करताना ठरावाच्या बाजूने ६ सदस्यांनी मतदान केल्याने ठराव नामंजूर झाल्याचे तहसीलदार तथा अध्यासी अधिकारी समीर मोहन यादव यांनी जाहीर केले.

त्यानंतर सरपंच कांचन निंबाळकर, ह.भ.प. हनुमंत महाराज रणवरे व इतर कार्यकर्त्यांनी स्वराज साखर कारखाना, उपळवे येथे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची भेट घेऊन भाजप मध्ये प्रवेश करीत असल्याची घोषणा केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सचिन कांबळे, सुरेखा कांबळे, माजी उपसरपंच जयश्री मोरे, मुकुंदराव बुवासाहेब रणवरे, रामचंद्र अडसूळ, शामराव कांबळे, धीरज कांबळे, बाळासो मोहिते, अमित रणवरे उपस्थित होते.

सरपंच कांचन निंबाळकर यांच्या भाजप प्रवेशानंतर खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, माजी पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे पाटील, ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांचे स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!