फलटण-बिरदेवनगर रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य; नगर परिषद व ग्रामपंचायत हद्दीच्या वादात नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पालखी सोहळ्यानंतर स्वच्छता न झाल्याचा नागरिकांचा आरोप; मोकाट जनावरांमुळे वाहतुकीसही अडथळा


स्थैर्य, फलटण, दि. २२ ऑगस्ट : फलटण-बिरदेवनगर मार्गावर, विमानतळाजवळच्या मुख्य रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा साठल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली असून, हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. फलटण नगर परिषद आणि जाधववाडी ग्रामपंचायत यांच्यातील हद्दीच्या वादामुळे या कचऱ्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत, ज्यामुळे त्यांच्यामध्ये संतापाची भावना आहे.

फलटण-बिरदेवनगर हा एक अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे. या मार्गावरील विमानतळाजवळ, विद्युत डीपीलगतच्या खड्ड्यात कचऱ्याचे मोठे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यातच ये-जा करणारे नागरिकही येथे कचरा टाकत असल्याने आणि सध्याच्या पावसाळी वातावरणामुळे परिसरात असह्य दुर्गंधी पसरली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यानही या जागेची स्वच्छता झाली नसल्याचे नागरिक सांगतात.

कचऱ्यातील अन्नपदार्थांमुळे या ठिकाणी मोकाट जनावरे आणि कुत्र्यांचा वावर वाढला आहे. ही जनावरे अनेकदा मुख्य रस्त्यावर येत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन लहान-मोठे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.

स्थानिकांच्या मते, नगर परिषदेची घंटागाडी संजीवराजेनगरपर्यंत तर ग्रामपंचायतीची गाडी बिरदेवनगर-नाळेमळा परिसरापर्यंत येते. मात्र, नेमका हा कचऱ्याचा ढीग दोन्ही प्रशासकीय हद्दींच्या मध्यावर असल्याने कोणीही याची जबाबदारी घेत नाही. त्यामुळे फलटण नगर परिषद आणि जाधववाडी ग्रामपंचायत प्रशासनाने आपसांत समन्वय साधून हा कचरा आणि वाढलेली झाडेझुडपे तातडीने स्वच्छ करावीत, अशी मागणी जोर धरत आहे.


Back to top button
Don`t copy text!