रिक्षाचालकांसाठी शासनाच्या कल्याणकारी योजनेची नोंदणी सुरू; फलटण RTO कार्यालयात सुविधा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण, दि. २४ सप्टेंबर : राज्यातील ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना सामाजिक सुरक्षा व विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब कल्याणकारी मंडळा’ची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) सुरू झाली आहे. या योजनेची माहिती देण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेच्या सदस्यांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात, सहायक मोटार वाहन निरीक्षक प्रफुल्ल दिलीप संकुडे यांनी योजनेची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, या कल्याणकारी मंडळामार्फत रिक्षाचालकांसाठी जीवन विमा, अपंगत्व विमा, कर्तव्य बजावताना दुखापत झाल्यास अर्थसहाय्य, पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, कौशल्य विकास आणि निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत ६५ वर्षांवरील चालकांना सानुग्रह अनुदान अशा अनेक योजनांचा लाभ मिळणार आहे.

याशिवाय, नवीन ऑटोरिक्षा किंवा घर खरेदीसाठी कर्ज मिळवण्यासाठीही या मंडळाची मदत होणार आहे. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे आणि नाममात्र नोंदणी शुल्क भरून रिक्षाचालक या मंडळाचे सभासद होऊ शकतात. यावेळी मोटार वाहन निरीक्षक विशाल वसंत पाटील यांच्यासह आरटीओ कार्यालयातील कर्मचारी आणि रिक्षा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. फलटण तालुक्यातील सर्व रिक्षाचालकांनी या योजनेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रफुल्ल संकुडे यांनी केले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!