दैनिक स्थैर्य | दि. ११ मे २०२३ | फलटण |
महिला आर्थिक विकास महामंडळ सातारा अंतर्गत ओमसाई व ज्ञानज्योती लोकसंचलीत साधन केंद्र फलटण नवतेजस्विनी उद्यम विकास प्रकल्पांतर्गत ९ मे रोजी ‘सुधारक पुरूष सन्मान’ कार्यक्रम २०२३-२०२४ राबविण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितांमध्ये नायब तहसीलदार फलटण संजीवनी सावंत, सहायक पोलिस निरीक्षक नितीन किणेकर, जिल्हा समन्वयक अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ सातारा विजय डोके, जिल्हा सहायक अधिकारी अशोक चव्हाण, कक्ष अधिकारी पंचायत समिती फलटण शिंदे सर, ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव, पोलीस पाटील संघटना अध्यक्ष दत्तात्रय सरक होते. तसेच सर्व गावचे पोलीस पाटील व सर्व गावच्या कार्यकारिणी उपस्थित होत्या. यावेळी गावपातळीवरून निवड केलेल्या ४६ गावांतील पुरूषांना त्यांच्या पत्नीसह तालुकास्तरीय सुधारक सन्मान पुरस्कार देण्यात आला.
यावेळी नायब तहसीलदार संजीवनी सावंत म्हणाल्या, पतीने पत्नीला सहकार्य केले तर प्रत्येक गावातील कुटुंबव्यवस्था व्यवस्थित चालेल.
सपोनि नितीन किणेकर यांनी प्रत्येक गावातील पोलीस पाटील तुम्हाला महिलांना सहकार्य करतील, असे सांगितले.
विजय डोके सर यांनी महिला आर्थिक विकास महमंडळाची व ज्ञानज्योती व ओमसाई संस्थेच्या कामाची पार्श्वभूमी याबद्दल माहिती सांगितली. तसेच नवतेजस्विनी योजनेबद्दल मार्गदर्शन केले.
किसन काशीद पोलीस पाटील यांनी पुरूषांचा मानसन्मान केल्याबद्दल कौतुक केले. तसेच प्रत्येक गावातून सहकार्य असेल, अशा भावना व्यक्त केल्या.
यावेळी सासकल गावचे सन्मानित पुरूष यांनी महिलांवर कविता सादर केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापक ओमसाई लोकसंचलित साधन केंद्र फलटण शिला घाडगे मॅडम यांनी केले. प्रस्तावना रेश्मा मोरे यांनी केले.
हा कार्यक्रम अध्यक्षा ज्ञानज्योती लोकसंचलित साधन केंद्र सुवर्णा नाळे तसेच अध्यक्षा ओमसाई लोकसंचलित साधन केंद्र मुमताज पठाण, ओमसाई व ज्ञानज्योती सर्व स्टाफ यांच्या उपस्थितीत पार पडला.