
स्थैर्य, दि.१७: राज्यातील आरोग्य विभागासंबंधी एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्याच्या आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात उद्याच जाहिरात निघणार असल्याचेही ते म्हणाले. ग्रामविकासमधील आरोग्याशी संबंधित 10 हजार आणि आरोग्य विभागातील 7 हजार अशा एकूण आरोग्य विभागासाठी लागणाऱ्या 17 हजार पदांची भरती केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. यापैकी सध्या 50 टक्के म्हणजे 8,500 पदांची जाहिरात उद्या येईल.
टोपे पुढे म्हणाले की, मी आरोग्य सचिवांना सोमवारपर्यंत जाहिरात देण्याबाबत सांगितले आहे. त्यानुसार, उद्या (18 जानेवारी) नोकर भरतीची जाहिरात निघेल. जीएनएम, नर्सेस, टेक्निशियन, वॉर्डबॉय अशी वेगवेगळी पद असतील. क आणि ड वर्गाच्या पदांची ही भरती असेल. 15 फेब्रुवारीपर्यंत परीक्षा होईल आणि त्यानंतर दोन तीन दिवसात निकाल लागेल, असे टोपे म्हणाले. दरम्यान, कोरोना काळात कंत्राटी काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे नोकरीचे कंत्राट संपले असले तरी त्यांना आगामी काळात आणि इतर नोकर भरती वेळी सामावून घेण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.