शिक्षक बँकेच्या कर्ज व्याजदरात विक्रमी कपात


स्थैर्य, सातारा, दि.११:  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या नुकत्याच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कर्ज व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयामुळे बँकेच्या सभासद वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे कोषाध्यक्ष सिद्धेश्‍वर पुस्तके यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक संघाचे प्रमुख पदाधिकारी व प्राथमिक शिक्षक बँकेचे सर्व सत्ताधारी संचालक, सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र जानुगडे, शिक्षक संघाचे माजी जिल्हाध्यक्ष मच्छींद्र मुळीक यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत बँकेच्या कर्ज व्याजदर कपातीबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर दि.9 फेब्रुवारी रोजी झालेल्या शिक्षक बँकेच्या संचालक मंडळ बैठकीत बँकेचे चेअरमन राजेंद्र घोरपडे, व्हाईस चेअरमन महेंद्र अवघडे, गटनेते मोहन निकम व संचालक मंडळाने कर्ज व्याजदर कपातीचा निर्णय घेतला.

या निर्णयानुसार सभासदांचे दीर्घ मुदत कर्ज नं.1 व्याजदर 13 – 50 चे 11 – 50, दीर्घ मुदत नंबर 2 व्याजदर 12 – 90 चे 12 – 25, घरबांधणी कर्ज व्याजदर 9 – 50 चे 8 – 90 व वाहन तारण कर्ज व्याजदर 9 – 50 चे 8 – 90 याप्रमाणे व्याजदर कमी करुन सभासदांना मोठा दिलासा दिला आहे.

‘‘बँकेच्या व्याजदर कमी करण्याच्या प्रक्रियेत मागील संचालक मंडळाने त्यांच्या कार्यकाळात एकदाही व्याजदर कमी केला नव्हता. याउलट आमच्या संचालक मंडळाने सलग 6 वेळा व्याजदर कमी करुन नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. शिक्षक नेते सिद्धेश्‍वर पुस्तके यांचे कल्पक व दूरदृष्टी असलेले नेतृत्त्व यामुळेच हे शक्य झाले आहे’’, असे सातारा जिल्हा शिक्षक संघाचे सरचिटणीस राजेंद्र बोराटे यांनी सांगितले.

या निर्णयाबद्दल बँक सभासदांकडून सर्व संचालकांचे अभिनंदन होत आहे.


Back to top button
Don`t copy text!