स्थैर्य, दि.५: गतवर्षी 2 जुलैच्या रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास फुटलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरणाची पुनर्बांधणी होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिलेल्या या घटनेत 23 जणांना जीव गमवावा लागला होता. फुटलेल्या तिवरे धरणाच्या भूगर्भीय अहवालाची तयारी सुरू करण्यात आली असून, धरणाच्या ठिकाणच्या कातळाची खोली आणि दर्जा तपासला जाणार आहे. विशेष म्हणजे हे धरण खेकड्यानी पोखरल्याने फुटले असा युक्तिवाद तत्कालीन जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केले होते. त्यामुळे आणखीनच चर्चा झाली होती.
दरम्यान या धरणाच्या ठिकाणी 11 बोअर मारून तपासणी सुरू करण्यात येणार आहे. भूगर्भतज्ज्ञांच्या अहवालानंतर धरणाच्या कामाला मंजुरी दिली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. तिवरे धरण दुर्घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. यात जलसंपदा विभागाचे सचिव तथा विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे हे या पथकाचे प्रमुख होते. या पथकामध्ये जलसंधारण विभागातील मुख्य अभियंता, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा समावेश होता. तिवरे धरण फुटल्याने भेंदवाडीतल्या 23 जणांचा बळी गेळा होता. या दुर्घेटनेच्या तपासणीसाठी सरकारने एसआयटी नेमली होती. या चौकशी समितीने तपास करुन अपला अहवाल तयार केला होता.
काय होती तिवरे धरण दुर्घटना
कोकणातील तुफान पावसाने जुलै महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यातलय चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले. हे धरण फुटल्याने पाण्याचा मोठा प्रवाह धरण पायथ्याच्या गावात घुसला. यामुळे अनेकजण वाहून गेले, अनेकजण धरणातील पाण्यासोबत आलेल्या चिखलात गाडले गेले. 2 जुलैच्या रात्री ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. धरण फुटल्यामुळे तिवरे बेंडवाडीतील 13 घरं वाहून गेली. तर आजूबाजूच्या गावात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली. तर धरण क्षेत्रात येणाऱ्या ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावात पाणी घुसलं. पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की या त्यामध्ये 24 नागरिक वाहून गेले. अनेक घरात पाणी घुसलं. प्रापंचिक साहित्य विस्कटून गेलं.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे धरण पूर्णपणे भरून वाहत होते. पाण्याचा प्रवाह धरणाच्या भिंतींना धडका देत होता. यामुळे धरणाच्या भिंतीस तडा गेला. रात्री 9 ते 9.30 च्या सुमारास भिंत ढासळून धरण फुटले. यामुळे त्यातील भराव 125 ते 150 मीटरपर्यंत वाहून गेला.
असे होते तिवरे धरण
हे धरण चिपळूणपासून 33 किलोमीटर अंतरावर आहे. लघु पाटबंधारे विभागाच्या या धरणाची लांबी 308 मीटर असून उंची 28 मीटर आहे. धरणाची साठवण क्षमता 2.452 दलघफू किंवा 0.08 टीएमसी आहे. 2012 मध्ये धरणाचे बांधकाम पूर्णत्वास गेले होते. 2004 मध्ये धरणातील गाळ उपसण्यात आला होता. प्रशासनाने 2 जुलैला दिलेल्या अहवालानुसार हे धरण 27.59 टक्के भरले होते. या धरणातील पाणी पुढे जाऊन वाशिष्टी नदीला जाऊन मिळते.
तत्कालीन जलसंधारण मंत्र्यांनी फोडले होते खेकड्यांवर खापर
खेकड्यांनी भोकं पाडल्याने जे भगदाड पडले त्यामुळेच तिवरे धरण फुटले असा अजब दावा तत्कालीन जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला होता. तिवरे धरण फुटणे ही एक नैसर्गिक आपत्ती होती. काही गोष्टी कुणाच्याही हातात नसतात. ही एक दुर्घटना होती. अधिकाऱ्यांशी आणि जुन्या जाणत्या ग्रामस्थांशी मी चर्चा केली त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे धरण खेकड्यांनी पोखरल्याने फुटले. खेकड्यांनी धरण फोडले असेल तर गुन्हा कुणावर दाखल करायचा असाही प्रश्न सावंत यांनी विचारला होता.