
दैनिक स्थैर्य । 4 मार्च 2025। फलटण । साहित्यिक हा जन्माला यावा लागतो, त्याचा जन्म कोठे व्हावा, हे त्याच्या हातात नसते. साहित्याला गरीब, श्रीमंत हा भेद नसतो. मन संवेदनशील होते. तेव्हा साहित्यकृती उदयास येते. साहित्य ही कोणाचीही मक्तेदारी नाही. साहित्यामध्ये जे सुचेल ते मांडता आले पाहिजे. साहित्यिकाला व्यक्त होता आले पाहिजे, त्यासाठी त्याचे वाचन प्रचंड असले पाहिजे. वाचन हे साहित्य संस्कृती समृद्ध करण्याचे प्रभावी माध्यम आहे, असे मत प्राचार्य विश्वासराव देशमुख केले.
ते साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशन, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटण व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा पंधरवडा, मराठी भाषा गौरव दिन व 24 वा साहित्यिक संवाद या कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी सर्जाकार व ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे होते.
कार्यक्रमास माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे, ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र बेडकीहाळ, माजी प्राचार्य रवींद्र येवले, साहित्यिक महादेवराव गुंजवटे, अॅड. वीरसेन सोनवणेे, प्रा. श्रेयश कांबळे, हरिराम पवार हनुमंत मोरे डॉक्टर तुषार शिंदे विकास शिंदे गणेश तांबे, गणेश शिंदे काशिनाथ ढेंबरे महेश ढेंबरे सचिन जाधव मंगेश कर्वे तसेच फलटण तालुक्यातील साहित्यिक व साहित्यप्रेमी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते अतुल चव्हाण यांच्या ‘भयान राती’ या कथासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
प्राचार्य विश्वासराव देशमुख म्हणाले, लेखक अतुल चव्हाण यांचा कथासंग्रह आपला ठसा उमटवेल असा विश्वास वाटतो. त्यांची प्रत्येक कथा ही आपल्या जवळची वाटते. ’भयान राती‘चे प्रकाशन हे हा दुर्मिळ योगायोग असून साहित्यिक संवाद फलटणमध्ये होतो ही दिशा देणारी घटना आहे. या सवांदात अनेक साहित्यिकांनी भेट देऊन स्वतःला व्यक्त केले आहे. यातून नव्या साहित्यिकांना बळ देण्याचे काम झालेले आहे. फलटणचा साहित्यिक संवाद हा महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरेल.
ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे म्हणाले, फलटणचा साहित्यिक संवाद आगळावेगळा आहे. यामध्ये प्रत्येकाला व्यक्त होण्याची संधी मिळत. प्रत्येक साहित्यिकाला फलटणचा साहित्यिक संवाद हा आपल्या जवळचा वाटतो. त्यामुळेच दर महिन्याला सर्व साहित्यिक मुक्तपणे या साहित्यिक संवादामध्ये चर्चा करून मते प्रदर्शित करतात.
ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र बेडकीहाळ म्हणाले, फलटणचा साहित्यिक संवाद दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. भारताची राजधानी दिल्ली येथे 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये याचा नामोल्लेख झाला ही गौरवाची बाब आहे. संयोजक व माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे यांच्या चिकाटीतूनच हा साहित्यिक संवाद आजपर्यंत टिकून राहिला आहे. तालुक्यातीलच नव्हे तर इतर जिल्ह्यातील साहित्यिकांनाही त्याचा लाभ मिळाला आहे. प्रत्येक महिन्याला नवीन संकल्पना घेऊन साहित्याला नवी दिशा देण्याचे काम ते करतात ही गौरवाची बाब आहे.
प्राचार्य रवींद्र येवले म्हणाले की ’भयान राती‘चे प्रकाशन हे रात्रीच्या प्रसंगी होते, हा दुर्मिळ योगायोग आहे. मराठी भाषा गौरव दिन व अमावस्या हा ही एक योगायोग आहे. ग्रामीण भागातील साहित्यिकांना बळ देण्याचे काम या साहित्यिक संवादातून होत आहे. अतुल चव्हाण यांच्या हातून अशाच साहित्य कृती निर्माण व्हाव्यात व त्यांचे साहित्य जगभर पसरावे.
साहित्यिक महादेवराव गुंजवटे, कवयित्री आशाताई दळवी, लेखक अतुल चव्हाण, सुधीर इंगळे, बँक मॅनेजर अमोल अनासाने, श्रेयश कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे, नियत वनक्षेत्र अधिकारी राहुल निकम, लेखक अतुल चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ताराचंद्र आवळे यांनी केले. ज. तु. गार्डे यांनी सूत्रसंचालन केले. नियत वनक्षेत्र अधिकारी राहुल निकम यांनी आभार मानले.