दैनिक स्थैर्य | दि. २५ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील २०२३-२४ मध्ये स्थगिती देण्यात आलेल्या सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडील विकासकामांना पुन्हा मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
याबाबत बोलताना आ. दीपक चव्हाण आणि श्रीमंत संजीवराजे यांनी सांगितले की, नव्याने मंजुरी मिळालेल्या कामांमध्ये प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडील बजेटच्या १५ कामांना रक्कम रूपये २७.७२ कोटींचा निधी, जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडील २५१५ इतर ग्रामीण विकास कार्यक्रमांतर्गत ४० कामांची स्थगिती उठवून रक्कम रूपये ६ कोटी ५८ लक्ष रूपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे व जि.प. जलसंधारण विभागाकडील बंधारे बांधण्यासाठी असलेली स्थगिती उठवून एकूण २५ कामांना रक्कम रूपये १५.९३ कोटी रूपयांच्या निधीची मंजुरी मिळालेली आहे.
सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे पुरवणी बजेटमधून रक्कम रूपये ३४ कोटींच्या एकूण १५ कामांना मंजुरी मिळालेली आहे. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेसाठी एकूण ४९ कामांना रक्कम रूपये ५.०० कोटींची मंजुरी मिळालेली आहे. तसेच बरेच वर्ष पवारवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जागा उपलब्ध होत नव्हती, त्यासाठी विशेष प्रयत्न करून जागा उपलब्ध करून २२१० वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य, ०६ सार्वजनिक आरोग्य, ८०० इतर खर्च या लेखाशिर्षांतर्गत रक्कम रूपये १३.०२ कोटींची मंजुरी मिळालेली असून लवकरच त्याची निविदा प्रसिध्द होणार आहे. त्याबरोबरच फलटण शहरामध्ये फलटण पंचायत समितीच्या सभापतींसाठी निवासस्थान बांधण्यासाठी रक्कम रूपये २.६४ कोटी रूपयांची मंजुरी मिळालेली असून सदरचे काम लवकरच सुरू होईल, अशी माहितीही आ. दीपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.