स्थैर्य, मुंबई, दि.१०: दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी
आंदोलनात पाकिस्तान आणि चीनचा हात असल्याचा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब
दानवे यांनी केला होता. यानंतर आता दानवे यांच्यावर विरोधकांनी हल्लाबोल
सुरू केला आहे. ‘रावसाहेब दानवेंचे वक्तव्य तथ्यहीन आहे. शेतकरी
आंदोलनाबाबत असे बोलायला नको होते, असे मत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी व्यक्त केले आहे
अजित
पवार पुढे म्हणाले की, ‘केंद्र सरकारने आपला हटवादीपणा सोडायला हवा.
केंद्र सरकारच्या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. केंद्रीय मंत्री
शेतकऱ्यांची चर्चा करतात पण तोडगा निघत नाही. हा कायदा शेतकऱ्यांच्या
फायद्याचा नाही, त्यामुळे आधीचाच कायदा कायम ठेवावा, अशी मागणी अजित पवार
यांनी केली आहे.
‘पंतप्रधान आणि लष्करप्रमुखांनी दानवेंच्या वक्तव्याची गंभीर दखल घ्यावी’- संजय राऊत
दिल्लीत
सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात असल्याचे
वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केले. आता या वक्तव्याचा शिवसेना खासदार संजय
राऊत त्यांच्याच शैलीत समाचार घेतला. रावसाहेब दानवे यांच्या या
वक्तव्याची पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि तिन्ही दलाच्या प्रमुखांनी गंभीर
दखल घेतली पाहिजे. भारताने पाकिस्तान आणि चीनवर सर्जिकल स्ट्राइक करायला
हवा असे राऊत म्हणाले आहेत.
काय म्हणाले होते रावसाहेब दानवे
राजधानी
दिल्लीत शेतकरी आंदोलनाचा आज 15 वा दिवस आहे. पंजाब, हरयाणातील शेतकरी
दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. देशातील इतर राजकीय पक्ष व शेतकरी संघटनांनी
शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. परंतू, भाजपचे नेते या
आंदोलनावर टीका करत आहेत. रावसाहेब दानवे यांनी तर या आंदोलनाचा संबंध थेट
चीन व पाकिस्तानशी जोडला आहे. दानवे म्हणाले होते की, ‘हे शेतकऱ्यांचे
आंदोलन नाही तर या मागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. पहिल्यांदाच देशातील
मुस्लिम समाजाला भरकटवले आणि सीएए आणि एनसीआरमुळे मुस्लिमांना देशाबाहेर
जावे लागेल, असे सांगितले. पण एखादा तरी मुसलमान बाहेर गेला का?’ असा सवाल
रावसाहेब दानवेंनी विचारला आहे.