दैनिक स्थैर्य | दि. १९ मार्च २०२४ | फलटण | विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
नुकतीच दोन दिवसांपूर्वी अकलूज येथील माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या “शिवरत्न” या निवासस्थानी माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली होती. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या भेटीला गेली असण्याची शक्यता राजकीय वर्तुळामध्ये वर्तवली जात आहे.
माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळावा; यासाठी विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे आग्रही होते. सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना माढा लोकसभा मतदारसंघांमधून उमेदवारी मिळावी; यासाठी श्रीमंत रामराजे यांनी फिल्डिंग सुद्धा लावली होती.
परंतु महायुतीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आला नसल्याने आगामी आपली भूमिकेबाबत चर्चा करण्यासाठी श्रीमंत रामराजे हे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या भेटीला गेली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.