दैनिक स्थैर्य । दि. २९ जून २०२३ । फलटण । विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी आजपर्यंत जे राजकारण केले आहे; ते फक्त आणि फक्त खोटं बोलूनच केलं आहे. रामराजे यांचा व धोम – बलकवडी, नीरा – देवधर अगदी ज्या महामंडळाचे हे स्वतःला जनक म्हणवून घेतात त्या कृष्णा खोरे महामंडळाचा सुद्धा यांचा काडीमात्र संबंध नाही. कृष्णा खोरे महामंडळाचा पहिला प्रस्ताव हा रामराजे राजकरणात येण्याआधीचा आहे. हिंदुह्रदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे, स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे कृष्णा खोरे महामंडळ स्थापन झाले आहे. रामराजेंनी आज पर्यंतचे राजकारण हे तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला खोटं बोलूनच केलं आहे, अशी खरमरीत टीका खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
कोळकी येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, भाजपा फलटण विधानसभा प्रमुख सचिन कांबळे, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, लतीफ तांबोळी, उद्योजक सागर शहा, मनोज कांबळे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
धोम – बलकवडी प्रकल्प व रामराजेंचा काडीमात्र संबंध नाही
विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज पर्यंत ज्यावर राजकारण केले; तरी रामराजेंचा व धोम – बलकवडी प्रकल्पाचा काडीमात्र संबंध नाही. रामराजे हे राजकारणात येण्याच्या आधी धोम – बलकवडी प्रकल्प प्रस्तावित होता. हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे व स्व. गोपीनाथ मुंडे यांनीच धोम – बलकवडी हा प्रकल्प प्रस्तावित केला होता; त्यानंतर भाजपा व शिवसेना युती सरकारच्या काळामध्येच धोम – बलकवडी प्रकल्प मार्गी लागला आहे. यामध्ये रामराजे यांनी ३० वर्षे ज्यावर तालुक्याचे राजकारण केले त्या धोम – बलकवडी प्रकल्प व रामराजेंचा काडीमात्र संबंध नाही, असे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
स्व. हिंदुराव यांचे स्वप्न पूर्ण करू शकलो याचा आनंद
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यावेळी म्हणाले कि, फलटण ते बारामती रेल्वेचे टेंडर प्रसिद्ध झाले असून आगामी काही दिवसात रेल्वेचे काम सुरु होणार आहे. फलटण ते बारामती रेल्वे सुरु झाल्याने देशाच्या दक्षिणेकडे जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या ह्या फलटण वरून जाणार आहेत. त्यामुळे फलटणचा नक्कीच फायदा होणार आहे. फलटण ते बारामती रेल्वेचे काम पूर्णत्वास जात असल्याने स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी फलटणकर जनतेला दिलेला शब्द पूर्ण होत आहे. स्व. हिंदुराव यांचे स्वप्न पूर्ण करू शकलो; याचा आनंद आहे.
नीरा – देवधर व धोम – बलकवडीच्या जोड कालव्यास “स्वराज हिंद” असे नाव देणार
फलटण शहासह तालुक्यातील जनतेला जिल्हास्तरीय न्यायालयीन कामासाठी सातारा येथे जावे लागत होते; आता सातारा येथे जावे लागणार नाही त्याचे कारण म्हणजे फलटण येथील जिल्हा सत्र न्यायालयाला मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आली आहे. आगामी काही काळामध्ये धोम – बलकवडी प्रकल्प हा बारमाही करणार आहे. आता आठमाही करण्यासाठीचे टेंडर प्रकाशित करण्यात आले आहे. यानंतर काहीच महिन्यात नीरा – देवधरचे झिरो वॉटर धोम बालकवडी द्वारे फलटण तालुक्यात पाणी आणणार आहे. धोम बलकवडीची जेंव्हा आखणी झाली होती तेंव्हाच हे करायचे ठरले होते; फक्त अडगळीत पडलेले प्रश्न आपण मार्गी लावत आहोत. नीरा – देवधर व धोम – बलकवडीच्या जोड कालव्यास “स्वराज हिंद” असे नाव देण्यात येणार आहे.
आगामी काही महिन्यात जिल्हा स्तरीय सर्व कार्यालये फलटणला सुरु करणार
फलटण येथे आगामी काही महिन्यात जिल्हा स्तरीय सर्व कार्यालये म्हणजेच अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यासोबतच कोळकी येथे विभागीय सिंचन भवन सुरु करण्यात येणार आहेत. त्यासोबतच साखरवाडी येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याची सुद्धा मागणी केली असून आगामी काही महिन्यात जिल्हा स्तरीय सर्व कार्यालयांची मंजुरी घेण्यात येणार आहे, असेही खासदार रणजितसिंह यांनी यावेळी स्पष्ट केले.