फलटणच्या श्रीराम मंदिरात रामनवमी व रामजन्मोत्सव संपन्न


दैनिक स्थैर्य | दि. 18 एप्रिल 2024 | फलटण | येथील संस्थान कालीन पुरातन, ऐतिहासिक श्रीराम मंदिरात बुधवार दि. १७ रोजी परंपरेनुसार रामजन्मोत्सव व रामनवमी कार्यक्रम धार्मिक वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

श्रीराम मंदिरात गुढी पाडव्यापासून दररोज सायंकाळी सलग ९ दिवस ह.भ.प. सतीश खोमणे, बारामती यांचे रामायणावरील प्रवचन आणि रामनवमी दिवशी राम जन्माचे किर्तन झाले.

मुधोजी मनमोहन राजवाड्या शेजारी असलेल्या येथील पुरातन श्रीराम मंदिरात रामनवमी उत्सवानिमित्त दर्शनासाठी फलटण शहर व पंचक्रोशीसह फलटण व शेजारच्या तालुक्यातून आलेल्या अबालवृद्ध भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सौ. मिथिलाराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रणजितसिंह देसाई, श्रीमंत सौ. शिलादेवी देसाई, यांच्यासह राजघराण्यातील मान्यवर उपस्थित होते.

श्रीमंत सगुणामाता आईसाहेब महाराज यांनी सन १७७४ ते १७९४ या कालावधीत, त्या संस्थानच्या गादीवर असताना सुमारे २२८/३० वर्षांपूर्वी या मंदिराची उभारणी केली असून त्या काळापासून येथे प्रतिवर्षी रामनवमी, श्रीराम रथोत्सव व अन्य धार्मिक कार्यक्रम परंपरागत पद्धतीने साजरे केले जातात.

श्रीरामनवमी उत्सवानिमित्त मानकरी वेलणकर कुटुंबातील प्रथमेश अतुल वेलणकर व मान्यवरांनी मुधोजी मनमोहन राजवाड्यातील राजघराण्याच्या देवघरातील प्रभू श्रीरामाची मूर्ती आणून मंदिरात प्रभू श्रीराम, सीता मातेला भेटविल्यानंतर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळक़र व श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्त्यजितराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे सुपूर्द केल्या. त्यांनी सदर मूर्ती सजविलेल्या पाळण्यात ठेवल्या. उपस्थित महिलांनी रामजन्माचा पाळणा म्हंटला.

प्रभू श्रीराम यांच्या जन्मानंतर युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

प्रभू श्रीराम सीतामातेच्या जयघोषात रामजन्मोत्सव मोठ्या उत्साही व भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला. त्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी पाळण्याजवळ व मंदिरात मोठी गर्दी केली होती. यावेळी राजघराण्यातील मान्यवर आणि मानकरी उपस्थित होते.

श्रीराम जन्मोत्सव व रामनवमी निमित्त श्रीराम मंदिरातील प्रभू श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण व हनुमानाच्या मूर्तींना आकर्षक वेशभूषा करण्यात आली होती. संपूर्ण सागवानी आणि उत्तम नक्षीकाम केलेल्या श्रीराम मंदिराच्या गाभाऱ्यात विद्युत रोषणाई, फुलांच्या माळा व मखमली पडदे लावून सुशोभीकरण करण्यात आले होते, मंदिर व परिसरात फुलांच्या माळा लावून विद्युत रोषणाई करण्यात आली होती. श्रीराम जन्मोत्सव व रामनवमी निमित्त मंदिर परिसरात मंडप उभारण्यात आला असून मंदिराचे दोन्ही मुख्य दरवाजे उघडण्यात आल्याने प्रचंड गर्दी असूनही भाविकांना आत येण्यास व बाहेर पडण्यास सोईस्कर मार्ग उपलब्ध झाले. त्यामुळे भाविकांची संख्या मोठी असूनही सर्वांना रांगेत व शिस्तीने दर्शन घेण्यातकोणतीही अडचण आली नाही.

रामजन्मोत्सवानंतर उपस्थित भाविकांना सुंठवडा प्रसाद म्हणून वितरीत करण्यात आला.

मंदिरातील मुख्य कार्यक्रमा नंतर मुधोजी मनमोहन राजवाड्यातील राजघराण्याच्या देवघरात प्रभू श्रीरामाची मूर्ती तेथे उपस्थित असलेल्या महिलांनी मोठ्या भक्ती भावाने आपल्या ओट्यात घेतली, व आपली मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी प्रभू श्रीरामाला साकडे घातले.

दरम्यान मंदिराबाहेर विविध विक्रेत्यांनी पान, फुल व पुजा साहित्य, मेवा मिठाईचे स्टॉल लावले होतेे. सकाळपासूनच श्रीरामाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गर्दीच्या नियंत्रणासाठी पोलीस यंत्रणेने मंदिर परिसरात बॅरिकेट्स उभारुन मंदिराकडे दुचाकी व चारचाकी वाहनांना प्रतिबंध केल्याने, आणि गर्दीवर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस सतर्क राहिल्याने भाविकांना शांततेत दर्शन घेता आले.

राम जन्मोत्सवानंतर रात्री उशीरापर्यंत फलटण शहर व परिसरातील अबालवृध्दांनी प्रभू श्रीराम सीतामाता, लक्ष्मण आणि हनुमानाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. फलटण नगर परिषद आणि नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्ट यांच्यावतीने या उत्सवासाठी विविध सुविधा भाविकांना उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

दरम्यान बारस्कर गल्ली, शुक्रवार पेठेतील पुरातन बालाजी मंदिरातही रामनवमी उत्सव परंपरागत पध्दतीने साजरा करण्यात आला. प्रामुख्याने मारवाडी समाजातील अबालवृध्द आणि बारस्कर गल्ली परिसरातील भाविक त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील वेलणकर दत्त मंदिर, भणगे दत्त मंदिर आणि बारस्कर चौकातील हनुमान मंदिरातही रामनवमी उत्सव परंपरागत पध्दतीने साजरा झाला.

दरम्यान आसू, तरडगाव, गोखळी, सोमंथळी,साखरवाडी, गिरवी, आदर्कीसह तालुक्यातील ग्रामीण भागातही रामनवमी उत्सवानिमित्त भजन, कीर्तन, राम नाम जप, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा लाभ ग्रामस्थ व भाविकांनी घेतला.


Back to top button
Don`t copy text!