दैनिक स्थैर्य | दि. ४ जून २०२३ | फलटण |
लष्करातील सेवा पूर्ण करून रामहरी गावात परतले आहेत. गावाच्या या सुपुत्राचे ग्रामस्थ व सर्व तरुण मंडळ सोनगाव (ता. फलटण) यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. गावापासून दूर राहून लष्करात २० वर्षे सेवा केलेल्या रामहरी यांची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. यावेळेस गावातील तरुणांनी भव्य बाईक रॅली काढत ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या.
यावेळी ठिकठिकाणी महिलांनी या वीर जवानासाठी औक्षण करून त्यांचे स्वागत केले. या स्वागताने रामहरी हे भारावून गेले. ‘मातृभूमीची सेवा करून परतलो आहे. नोकरीची सेवापूर्ती झाली असली तरी देशसेवा अंतिम श्वासापर्यंत सुरूच राहील, आता जो वेळ मिळाला आहे तो गावातील विकासाच्या कामासाठी देईन,’ अशी प्रतिक्रिया रामहरी यांनी यावेळी व्यक्त केली.
सोनगाव गावात लक्ष्मीदेवी सभामंडपात सेवापूर्तीचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. जवान रामहरी यांच्याबद्दलच्या भावना काही मान्यवरांनी यावेळी मनोगतातून व्यक्त केल्या. यामध्ये सोनगावचे माजी सरपंच श्री. पोपटराव बुरुंगले, श्री. हनुमंत थोरात, श्री. धनाजी मोरे, श्री. उत्तम शेंडे यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे मा. प्राचार्य रवींद्र येवले उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या व्याख्यानातून सर्वांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेश निकाळजे यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभेदार मेजर ऑर्डनरी कॅप्टन सखाराम उभे यांनी अध्यक्षीय भाषण केले. त्यांच्या हस्ते जवान रामहरी यांचा सत्कार करण्यात आला.
रामहरी यांचा मित्र परिवार, ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, सर्व तरुण मंडळे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळेस उपस्थित गावातीलच जवान विजय गोरवे व रिटायर्ड जवान संदीप ढवळे यांचाही सत्कार करण्यात आला.
ग्रामपंचायत सोनगाव, विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ, सोनगाव बंगला व सर्व तरुण मंडळ सोनगाव यांच्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.