दैनिक स्थैर्य | दि. ३१ ऑगस्ट २०२३ | बारामती |
बारामती तालुका महिला राष्ट्रवादी, रागिनी फाऊंडेशन, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, बारामती यांच्यावतीने आज बारामती शहर पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधननिमित्त पोलीस बांधवांना राखी बांधण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मुली व महिलांना जास्तीत जास्त कायदेविषयक माहिती असणे गरजेचे आहे, कायदेविषयक कोणत्याही गोष्टींची भीती न बाळगता आपल्यावर होणारे अन्याय, अत्याचार जर आपण स्वतः पुढाकार घेऊन पोलीस स्टेशनपर्यंत माहिती दिल्यास भविष्यातील अनेक धोके टाळता येतात. स्वतःच्या संरक्षणासाठी महिलांनी कायम दक्ष असणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही अडचणीच्या वेळी महिला व मुलींनी ११२ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन निलेश तायडे, पोलिस निरीक्षक, बारामती शहर पोलिस स्टेशन यांनी केले आहे.
यावेळी बारामती तालुका महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्ष वनीताताई बनकर यांनी उपस्थित महिला व मुलींना मार्गदर्शन केले. तसेच बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये महिला सुरक्षा समितीची स्थापना करून महिलांनादेखील पोलिसांच्या मदतीसाठी काम करता यावे, अशी मागणी केली.
पोलीस नेहमीच सतर्क राहून समाजामध्ये सुरक्षितता आणि शांतता ठेवण्याचे काम करत असतात. आपले कर्तव्य बजावत असताना रक्षाबंधन सण साजरा करण्याचा आनंद मिळावा, या उद्देशाने हा कार्यक्रम पोलीस कर्मचार्यांकरिता राबवण्यात आला असल्याचे रागिणी फाऊंडेशनच्या अध्यक्षा राजश्री आगम यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय बारामतीच्या ब्रह्मकुमारी चंद्रलेखा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.