दैनिक स्थैर्य | दि. २४ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील धनगर समाजबांधव यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना राजमाता अहिल्यादेवी होळकर भवनसाठी निवेदन दिले होते. या निवेदनाची पूर्तता करण्यासाठी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सकारात्मक विचार करुन या सामजिक उपक्रमासाठी आपण जागा उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही दिली.
यासंदर्भात बोलताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी या भवनसाठी फलटण शहर हद्दीतील नगरपालिकेच्या मालकीची किंवा शहरानजीक जाधववाडी किंवा कोळकी येथे आपण जागा उपलब्ध करून समाजबांधवांच्या सामजिक मागणीची पूर्तता करू, असे आश्वासन दिले.
होळकर घराण्याबाबत बोलताना त्यांनी होळकर घराण्याच्या सामाजिक, धार्मिक कार्याचा उल्लेख करून गौरव केला. या सर्व ऐतिहासिक कार्याचा आम्ही लोणंद येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा अनावरण करून तसेच फलटण येथे चौकाचे नामस्मरण करून होळकर घराण्याबाबत असणार्या आदरयुक्त भावना कृतीतून व्यक्त केल्या आहेत. होळकर घराणे हे आपल्या तालुक्यातील मुरूम या गावचे आहे. पण मल्हारराव होळकर यांनी त्यावेळी माळवा येथे जाऊन इंदूरची गादी आपल्या कर्तृत्वाने स्थापन केली आणि हाच वारसा राजमाता यांनी अनेक शिवमंदिराचा जीर्णोध्दार, पिण्याच्या पाण्याच्या सोयी तसेच घाटांची उत्तम बांधणी अशा बर्याच सामजिक उपक्रमातून चालवून समाजसेवा केली आहे. त्यांच्या या कार्याचा आदर करून आम्ही याबाबत कृतिशील राहू, असे सांगितले.
यावेळी फलटण तालुक्यातील प्रमुख समाजबांधव श्री. रामभाऊ ढेकळे (वाखरी), ज्येष्ठ नेते शंकरराव माडकर, भीमदेव बुरुंगले, दादासाहेब चोरमले, व्यंकट दडस, महादेव सोनवलकर, दादासाहेब महानवर, डोबळवाडीचे सरपंच आदी उपस्थित होते.