
थेट WhatsApp वर मिळवा
लायन्स क्लब ऑफ फलटण आणि माळजाई मंदिर व उद्यान समितीच्या संयुक्त विद्यमाने दीपावलीच्या निमित्ताने फलटणमधील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा विशेष दिवाळी स्नेहमिलन व विचारमंथन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
स्थैर्य, फलटण, दि. ११ नोव्हेंबर : दिवाळी सणाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ फलटण व लायन्स क्लब संचलित माळजाई मंदिर व उद्यान समिती यांच्या वतीने माळजाई मंदिर परिसरात फलटणमधील विविध क्षेत्रातील मान्यवरांसाठी विशेष दिवाळी स्नेहमिलन व विचारमंथन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात स्वच्छता, सौंदर्यीकरण आणि शहर विकासावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
फलटण-कोरेगाव मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व सार्वजनिक क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार आणि विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘फराळ गोड, चर्चा स्वच्छतेची, ध्येय विकासाचे’ या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांचा सहभाग वाढवण्यावर भर देण्यात आला.
शहर विकासाचा संकल्प व मार्गदर्शन
माळजाई मंदिर व उद्यान परिसरामध्ये गेल्या काही काळात सुशोमीकरण आणि नागरिकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. या कार्याचा विस्तार करताना शहरातील विविध संस्था आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचे अनुभव व सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांशी मनमोकळ्या गप्पा मारत विचारांची देवाणघेवाण करण्यात आली. आमदार सचिन पाटील यांनी फलटण शहराच्या विकासासाठी आपले व्हिजन मांडले आणि नागरिकांच्या आगामी काळातील सर्व समस्या निश्चितपणे सोडवण्यात येतील, असे आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या शेवटी दिलीप शिंदे यांनी सर्व पाहुण्यांचे आभार मानले.





