स्थैर्य, मुंबई, दि.८: मुंबईतील कोविड सेंटरचे काम मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या मुलाला दिल्याचा खळबळजनक आरोप विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत केला आहे. या प्रकरणी त्यांनी चौकशीची मागणीही केली आहे. तसेच जनतेच्या पैशावर उभारलेली जम्बो कोविड सेंटर ठेकेदारांच्या हितासाठी असल्याची टीकाही यावेळी दरेकरांनी केली आहे.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून आपल्या मुलाच्या कंपनीला काम दिले असा आरोप भाजपने केला आहे. सध्या विधान परिषदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यामध्ये विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकरांनी हा आरोप केला आहे. तसेच या प्रकरणी तात्काळ चौकशी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.ड
महात्मा फुले जनआरोग्य योजनेसंदर्भात केले हे आरोप
विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकरांनी राज्य सरकारवर अनेक आरोप केले आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये अवघ्या 4,878 रुग्णांना लाभ मिळाला असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच या योजनेतील 31 हजार अर्ज प्रलंबित असल्याचंही ते म्हणाले. तसेच 540 कोटींचा पुरवणी खर्च तुटपुंजा असल्याचे म्हणत लाभार्थी रुग्णांची संख्या जाहीर करण्याची मागणी दरेकरांनी केली आहे.
यापूर्वी मनसेने केला होता आरोप
मुंबईतील कोव्हिड सेंटरचे काम देण्यात मुंबईच्या महापौरांनी आपल्या पदाचा गैरवापर करून आपल्या मुलाच्या कंपनीला काम दिले असल्याचा आरोप यापूर्वी मनसेकडून करण्यात आला होता. वरळी व इतर जम्बो कोव्हीड सेंटरमध्ये लेबर सप्लायचे काम किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया या कंपनीला देण्यात आले. त्यांचा यामध्ये पूर्वीच्या कामाचा अनुभव तपासण्यात आला होता का? कारण या कंपनीच्या अॅडिशनल डायरेक्टर म्हणून महापौरांचे चिरंजीव सरप्रसाद पेडणेकर आहे असे मनसेने म्हटले होते. इतरांना ही टेंडर का मिळाली नाही असा सवालही मनसेने विचारला होता.