स्थैर्य, पुणे, दि.५: झपाटलेला चित्रपटातील ‘बाबा चमत्कार’ फेम ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी वयाच्या 83 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कडकोळ यांनी अनेक मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकेत काम केले आहे. मात्र ‘झपाटलेला’ चित्रपटात त्यांनी साकारलेली ‘बाबा चमत्कार’ ही भूमिका विशेष गाजली. बाबा चमत्कारने त्यात्या विंचूला दिलेला ‘ओम भट स्वाहा’ हा मृत्यूंजय मंत्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
राघवेंद्र कडकोळ यांनी ब्लक अँड व्हाईट, गौरी, सखी, कुठे शोधू मी तिला, पळवापळवी, वाजवू का?, पंढरीची वारी या चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. तसेच करायला गेलो एक, धोंडी, देवदासी, हसुया पण कायद्याच्या कचाट्यात, रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकांत काम केले आहे.
राघवेंद्र कडकोळ यांनी तीस वर्षे मराठी नाटक-चित्रपट, मालिकांतून काम केले. राघवेंद्र यांनी कृष्णधवल चित्रपटांपासून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. कर्नाटकी लहजा काढत बोलणाऱ्या भूमिकाच त्यांच्या वाटेला अधिक आल्या.
बालगंधर्व जीवन पुरस्काराने गौरव
राघवेंद्र कडकोळ यांना बालगंधर्व जीवन पुरस्कार आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेतर्फे ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्काराने’ गौरवण्यात आले होतं. त्यांनी गोल्ड मेडल नावाचे पुस्तक लिहिले आहे.