
थेट WhatsApp वर मिळवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, रब्बी हंगामासाठी खत खरेदीवर ६२,३७० कोटी रुपयांचे विक्रमी अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
स्थैर्य, सातारा, दि. १३ नोव्हेंबर : आगामी रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने फॉस्फेटिक आणि पोटॅशिक (P&K) खतांच्या खरेदीसाठी ६२,३७० कोटी रुपयांच्या ‘न्युट्रीअंट बेस सब्सिडी’ (NBS) दरांना मंजुरी दिली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतींमधील अस्थिरतेचा कोणताही भार देशातील शेतकरी बांधवांवर पडू नये आणि त्यांना वाजवी दरात खते उपलब्ध व्हावीत, यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय दरवाढीपासून संरक्षण
आंतरराष्ट्रीय बाजारात खते आणि कच्च्या मालाच्या किमतीत सतत होणाऱ्या बदलांमुळे देशांतर्गत शेतीचे अर्थकारण विस्कळीत होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. या मंजूर अनुदानामुळे डाय-अमोनियम फॉस्फेट (DAP) आणि इतर संमिश्र खते शेतकऱ्यांना नियंत्रित व सवलतीच्या दरात मिळणे सुलभ होणार आहे. यामुळे पेरणीच्या मोसमात खतांचा तुटवडा भासणार नाही आणि शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल.
खत पुरवठा सुरळीत राहणार
या योजनेअंतर्गत खत उत्पादक आणि आयातदारांना सुधारित दराने अनुदान दिले जाणार असून, ज्यामुळे राज्यातील तसेच देशातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात आवश्यक असणारी सर्व मुख्य खते वेळेवर आणि योग्य किमतीत मिळतील. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण असून, शेती खर्चाचा ताण काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.





