
थेट WhatsApp वर मिळवा
जमीन आणि घर खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी शासनाकडून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. यापुढे दस्त नोंदणीसाठी साक्षीदारांची गरज संपुष्टात आली असून, सर्व पक्षकारांचे आधार प्रमाणीकरण आणि डिजिटल प्रक्रिया सक्तीची करण्यात आली आहे.
स्थैर्य,सातारा, दि. १३ नोव्हेंबर : जमीन आणि घर खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमधील अनागोंदीला व दलालांच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने दस्त नोंदणी प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. या नव्या नियमांमुळे जमीन व्यवहारांमध्ये साक्षीदार उभे करण्याची जुनी पद्धत आता पूर्णपणे बंद करण्यात आली असून, त्याऐवजी आधार आधारित डिजिटल प्रमाणीकरणाला बंधनकारक करण्यात आले आहे.
जुनी पद्धत आणि गैरप्रकार बंद
यापूर्वी जमीन व्यवहारादरम्यान अंगठ्याचा छाप न जुळल्यास किंवा ओळख पटवण्यासाठी दोन साक्षीदार उभे करून व्यवहार पूर्ण केला जात होता. मात्र, याचा गैरफायदा घेऊन बोगस व्यवहार आणि फसवणुकीचे प्रकार वाढले होते. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शासनाने साक्षीदाराची ही सोय रद्द केली आहे. नवीन नियमांनुसार, बायोमेट्रिक किंवा फिंगरप्रिंटद्वारे आधार प्रमाणीकरण झाल्याशिवाय कोणताही दस्त नोंदवला जाणार नाही.
डिजिटल प्रक्रियेची तयारी आणि निकष
ही ऑनलाईन पडताळणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पक्षकारांकडे अँड्रॉइड ९.० किंवा त्यापुढील अद्ययावत स्मार्टफोन, सक्रिय इंटरनेट आणि अधिकृत आधार ॲप असणे अनिवार्य आहे. नोंदणी प्रक्रियेत होणारा विलंब टाळण्यासाठी नागरिकांनी दुय्यम निबंधक कार्यालयात जाण्यापूर्वी मोबाईलमधील आधार ॲपद्वारे प्राथमिक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक टळणार असून दलालांना मोठा चाप बसणार आहे.





