दैनिक स्थैर्य । 28 नोव्हेंबर 2024 । फलटण । येथील कुरेशीनगर येथील तय्यब आदम कुरेशी (वय 45), आरीस गफुर कुरेशी (वय 36), बिलाल रफिक कुरेशी (वय 34), झिरशान उर्फ दिशान इमाम बेपारी उर्फ कुरेशी (वय 20), आबु उर्फ अल्ताब अफसर कुरेशी (वय 26) या पाच जणांवर दोन वर्षाकरीता तडीपारची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधिक्षक कार्यालय, सातारा यांचेकडून देण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 व प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 कायद्याअंतर्गत गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यास, कत्तलीसाठी वाहतुक करणे, कत्तलीसाठी जनावरे एकत्र जमा करणेस मनाई असताना उपरोक्त टोळी प्रमुख व टोळी सदस्य हे गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करताना मिळून आल्यामुळे त्यांचेवर गुन्हे दाखळ असल्याने त्यांना वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करुनही त्यांचेवर गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नसून हे इसम फलटण तसेच परिसरात सातत्याने गुन्हे करीत होते, त्यांचेवर कायद्याचा कोणताच धाक न राहील्यामुळे फलटण परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता, अशा टोळीवर सर्वसामान्य जनतेमधून कडक कारवाई करणेची मागणी होत होती. त्यामुळे फलटण शहर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी हेमंतकुमार शहा यांनी सदर टोळीविरुद्ध महाराष्टऽ पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे सातारा जिल्ह्यातून तसेच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका, पुणे जिल्ह्यातील बारामती व पुरंदर तालुका हद्दीतून दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधिक्षक सातारा यांचेकडे केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी केली होती.
त्यानुसार हद्दपार प्राधिकरण तथा सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख यांचेसमोर समोर टोळी प्रमुख तय्यब आदम कुरेशी, टोळी सदस्य आरीस गफुर कुरेशी, बिलाल रफिक कुरेशी, झिशान उर्फ दिशान इमाम बेपारी उर्फ कुरेशी, आबु उर्फ अल्ताब अफसर कुरेशी यांची सुनावणी होवून समीर शेख यांच्याकडून सदर टोळीस सातारा जिल्ह्यासह सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका, पुणे जिल्ह्यातील बारामती व पुरंदर तालुका हद्दीतून दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.
या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्यावतीने श्रीमती वैशाली कडुकर, अपर पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पोलीस कॉन्स्टेबल केतन शिंदे, महिला पोलीस कॉन्स्टेबल अनुराधा सणस, फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार बापु धायगुडे, सचिन जगताप, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र टिके यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.