स्थैर्य, सातारा, दि.४ : पुसेगाव (ता. सातारा) येथील धोकादाय व कुख्यात गुन्हेगार शीतल ऊर्फ नितीन भीमराव खरात (वय 28, रा. पुसेगाव, ता. खटाव) याला जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्याला जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक विश्वजित घोडके यांनी खरात याला एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पाठविला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक निरीक्षक आनंदसिंह साबळे यांनी पडताळणी करून हा प्रस्ताव बन्सल व अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला होता. त्याच्याकडून खून, खुनाचा प्रयत्न, साधी व गंभीर दुखापत, मालमत्तेचे नुकसान करणे, खंडणी मागणे, जबरी चोरी, तसेच सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण होण्याचे प्रकार घडू शकतात, अशी खात्री झाल्याने शेखर सिंह यांनी त्याला स्थानबद्ध करण्याचे आदेश काढले.
त्यानंतर त्याला जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक गणेश किंद्रे, अशोक थोरात, सहायक पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके, उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे हवालदार प्रवीण शिंदे, पुसेगावचे सहायक फौजदार आनंदराव जगातप, हवालदार विजय खाडे, सचिन माने, इम्तियाज मुल्ला, सुनील अब्दगिरे, सचिन जगताप, विलास घोरपडे यांनी या कारवाईसाठी विशेष परिश्रम घेतले.