
थेट WhatsApp वर मिळवा
गुजरातमधील जुनागढ येथील ३६ किमी गिरनार परिक्रम २० ते २४ नोव्हेंबर २०२६ दरम्यान पार पडली असून पुरंदरचे धुरंदर जय मल्हार ग्रुप नाझरे-जेजुरीच्या सदस्यांनी सहभाग नोंदवला.
स्थैर्य, जुनागढ, दि. २८ नोव्हेंबर : गुजरातमधील जुनागढ येथील प्रसिद्ध गिरनार परिक्रमा २० नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर २०२६ दरम्यान पार पडली असून यामध्ये आठ ते नऊ लाख भाविकांनी सहभाग नोंदवला. या गिरनार परिक्रमेमध्ये पुरंदरचे धुरंदर जय मल्हार ग्रुप नाझरे-जेजुरी यांच्या वतीने सहभाग नोंदविण्यात आला. या परिक्रमेविषयी माहिती देताना बजरंग गावडे यांनी सांगितले की, गिरनार पर्वत गुजरात मधील जुनागढजवळ असून हिंदू व जैन दोन्ही धर्मासाठी अतिशय पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या पर्वताला रैवतक किंवा उज्जयंता असेही म्हटले जाते.
जैन धर्मासाठी हे क्षेत्र विशेष महत्त्वाचे आहे, कारण बावीसावे तीर्थंकर भगवान नेमिनाथ यांनी याच पर्वतावरून मोक्ष प्राप्त केला होता. या पर्वतावर नेमिनाथ मंदिर असून श्वेतांबर आणि दिगंबर या दोन्ही पंथाची संगमरवरी नक्षीकामाने सजलेली मंदिरे आहेत. तसेच अंबामाता मंदिर, गोरखनाथ मंदिर, रामनाथ महादेव मंदिर, कालीका माता मंदिर, भवनाथ महादेव मंदिर, जटा शंकर महादेव मंदिर, गोमुखी गंगा आणि हनुमान धारा, भगवान नेमिनाथ मंदिर, मल्लिनाथ मंदिर, पार्श्वनाथ मंदिर, ऋषभ देव (आदिनाथ मंदिर), वस्तुपाठ-तेजपाल मंदिर व समवसरण मंदिर, तसेच गुरुशिखरावर दत्तात्रेयांची त्रिमुख मूर्ती व चरण पादुका आहेत.
३६ किमी परिक्रमेचा मार्ग व गुरुशिखर दर्शन
ही परिक्रमा वर्षातून एकदाच होते. कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजे देव दिवाळीच्या आसपास नोव्हेंबर महिन्यात साधारण पाच दिवसांची ही परिक्रमा असते. ही परिक्रमा ३६ किलोमीटरची आहे. या गिरनार परिक्रमेची सुरुवात गिरनार तळेटी जवळच्या दुधेश्वर महादेव मंदिरापासून होते. तिथून पहिला मोठा टप्पा असून भवनाथ ते जिनबाबानी मढी साधारण बारा किलोमीटर, पुढे जिनबाबानी मढीपासून मालवेला आणखी आठ किलोमीटर आणि बोरदेवहून पुन्हा भवनाथ तळेटी अशी शेवटची आठ किलोमीटर, अशी पूर्ण फेरी ३६ किलोमीटरची परिक्रमा होते. सलग बारा तास जंगल मार्गाची परिक्रमा पूर्ण झाल्यावर गुरुशिखरावरील दत्तगुरुंच्या चरण पादुकांचे तसेच दत्तात्रेयांच्या त्रिमुख मूर्तींचे दर्शन, अखंड धुनीचे दर्शन व महाप्रसाद घेण्यात आला. गिरनारची परिक्रमा ही केवळ धार्मिक यात्रा न राहता माणुसकी, एकोपा आणि सेवाभावाचा सुंदर संदेश देणारी परिक्रमा ठरते, असे बजरंग गावडे यांनी नमूद केले.
चार वर्षांत ७० किल्ले ट्रेकिंग व सहभागी सदस्य
पुरंदरचे धुरंदर ग्रुपने गेल्या चार वर्षांपासून सत्तर किल्ले ट्रेकिंग तसेच गिरनार परिक्रमा आणि गुरुशिखर सलग चार वेळा पूर्ण केले आहे. या परिक्रमेत संतोष कोळगे, निलेश जांभळे, सागर विभाग, नानासो खौरे, सतिश विभाग, आशिष पवार, तात्यासो येवले, ॲड. शुभांगी गावडे, कपिल रोटे आणि बजरंग गावडे यांनी भाग घेतला होता.



