दैनिक स्थैर्य | दि. ३० मे २०२३ | फलटण |
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबिर सोमवारी फलटण पंचायत समिती सभागृहामध्ये संपन्न झाले.
राज्यातील महिलांकरीता शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती महिलांना उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने तसेच त्यांच्या स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबिर हा महिला विशेष कार्यक्रम राबविणेबाबत शासनाने मान्यता दिली आहे. त्याअनुषंगाने या कार्यक्रमासाठी फलटणचे तहसीलदार समीर यादव, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजय तावरे, पशूधन विकास अधिकारी डॉ. फाळके, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाचे उपअभियंता शिवणकर, गटविकास अधिकारी कुंभार, गटशिक्षणाधिकारी पठाण मॅडम, तालुका व्यवस्थापक आटोळे मॅडम, आर्थिक विकास महामंडळाच्या घाडगे मॅडम, बाल विकास प्रकल्प अधिकारी कोळेकर, इंगळे, संरक्षण अधिकारी सोनाली करपे, विस्ताराधिकारी सांख्यिकी भांगरे, पवार व सर्व पर्यवेक्षिका, सर्व कार्यालयीन कर्मचारी व सर्व समस्याग्रस्त महिला उपस्थित होत्या.
या शिबिरामध्ये फलटण तालुक्यातील सर्व खातेप्रमुख उपस्थित राहून महिलांच्या समस्या समजून घेतल्या. समस्या अर्ज प्राप्त संख्या ५११, यापैकी ३११ महिला उपस्थित होत्या. उपस्थित महिलांपैकी १०४ समस्या अर्जांचे निराकरण करण्यात आले. राहिलेले सर्व अर्ज संबंधित विभागाकडे पाठवण्यात आले.
सूत्रसंचालन पर्यवेक्षिका विद्या कांबळे व कोमल फुले यांनी केले. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धीरज गोडसे व सर्व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. आभार बालविकास प्रकल्प अधिकारी एस .एल. इंगळे यांनी मानले.