दैनिक स्थैर्य | दि. ३ मार्च २०२४ | फलटण |
महाराष्ट्र राज्य तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत ‘क’ वर्ग प्राप्त देवस्थान पुण्यमाता आईसाहेब महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त पायी दिंडी सोहळा मंगळवार, दि. २७ फेब्रुवारी २०२४ ते रविवार, दि. ०३ मार्च २०२४ पर्यंत श्री क्षेत्र लाटे ते किरकसाल निघाला असून तो सोहळा २९ फेब्रुवारी २०२४ गुरुवार रोजी श्री क्षेत्र किरकसाल येथे पोहचून ग्रामस्थांतर्फे या पायी दिंडी सोहळ्याचे जंगी स्वागत करण्यात आले. तसेच आईसाहेब यांचे माहेरघरी हळदीकुंकू व उखाणे, बुत्ती व फुले टाकण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
संध्याकाळी ७ ते ८ ह. भ. प. विकास महाराज देवडे (कर्जत ) यांचे कीर्तन होऊन शुक्रवार दि. १ मार्च २०२४ रोजी या पायी दिंडी सोहळ्याचे लाटे गावाकडे प्रस्थान झाले. रविवार, दि. ३ मार्च २०२४ रोजी पुण्यमाता आईसाहेब महाराज की जय, श्री सद्गुरू हरिबुवा महाराज की जयच्या नामघोषात श्री सद्गुरू हरिबुवा महाराज मंदिरात हा पायी दिंडी सोहळा दुपारी विसावला.
श्री सद्गुरू हरिबुवा महाराज ट्रस्टच्या वतीने पुण्यमाता आईसाहेब महाराज यांची खणानारळाने ओटी भरून पायी दिंडी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. हा सोहळा मंदिरात आल्यानंतर आरतीचा कार्यक्रम होऊन उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
पुण्यमाता आईसाहेब महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. नंतर भजनी मंडळांनी आपली भजन सेवा सादर केली. या पायी दिंडी सोहळ्याचे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास श्री क्षेत्र लाटे गावाकडे प्रस्थान झाले.