माढा लोकसभेचे महायुतीचे तिकीट कुणाला?; मतदारसंघाचे लक्ष

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ३ मार्च २०२४ | फलटण |
येणार्‍या काही दिवसांवर लोकसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत. यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून महायुती म्हणजेच भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना यांची उमेदवारी कोणाला जाहीर होणार? याकडे माढा लोकसभा मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच प्रबळ दावेदार असून धैर्यशील मोहिते पाटील यांनीसुद्धा आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी चालू केली आहे व पक्षाकडे लोकसभा निवडणुकीची मागणी केली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती २००९ साली झाली. २००९ साली माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व हे माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केले होते. त्यानंतर झालेल्या २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी केले होते. सन २०१९ साली माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उमेदवारी मिळवली व भरघोस मतांनी निवडून सुद्धा गेले.

रणजितसिंह नाईक निंबाळकर सन २०१९ साली खासदार म्हणून निवडून गेल्यापासून माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये हजारो कोटींचा निधी आणलेला आहे. मतदारसंघांमधील पाण्याचे व रस्त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमीच कार्यरत राहिलेले आहेत. राज्यातील विरोधकांसोबत थेट पंगा सुद्धा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतलेला आहे. फलटण व माळशिरसचे हक्काचे पाणी बारामतीला वळवल्यावरून तर थेट शरद पवार व अजित पवारांना त्यावेळी विरोध केला होता. फलटण व माळशिरस तालुक्याचे हक्काचे पाणी पुन्हा मिळण्यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांनी विविध योजना मार्गी लावल्या आहेत. ज्या मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीचे काडीमात्र अस्तित्व नव्हते; त्याच मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीचे स्वतंत्र अस्तित्व करण्यामध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना यश आले आहे.

सन २०१९ साली झालेल्या निवडणुकीमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भरघोस मतांनी निवडून गेले होते. त्यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा गट हा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत होता; परंतु आता तशी परिस्थिती बघायला मिळत नाही. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात मोहिते पाटील गट सक्रिय आहे. काहीही झाले तरी यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे, असा पवित्रा मोहिते पाटील गटाने घेतला आहे.

गेल्या काही दिवसांपासून माढा लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सुद्धा दावा सांगितला होता; परंतु भारतीय जनता पार्टीच्या वतीने माढा लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षकपदी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ना. भागवत कराड व आमदार प्रसाद लाड यांची नियुक्ती केल्याने माढा लोकसभा मतदारसंघ हा महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीकडेच राहणार असल्याची चर्चा सध्या मतदारसंघामध्ये सुरू आहे.

नक्की उमेदवारी कोणाला मिळणार याकडे लक्ष…

आगामी होणार्‍या लोकसभा निवडणुकांसाठी माढा लोकसभा मतदारसंघातून महायुती म्हणजेच भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना यांची अधिकृत उमेदवारी कोणत्या उमेदवाराला मिळते? याकडे आता सातारा व सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.


Back to top button
Don`t copy text!