स्थैर्य, पुणे, दि.२९: कोरोनाची (कोविड-19) संभाव्य दुसरी लाट येण्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात आवश्यक ती सर्व खबरदारी व पूर्वतयारी करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही याबाबत आढावा घेवून योग्य त्या सूचना दिल्या आहेत. रुग्णोपचार व्यवस्थापन, प्रयोगशाळा तपासणी, कोविड सुविधा केंद्र आणि इतर महत्त्वाच्या बाबींवर लक्ष देवून पुणे जिल्हा कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी सज्ज झाला आहे.
कोविड १९ लसीकरणाकरिता जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कृती दल समिती स्थापन करण्यात आली असून त्यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक 7 डिसेंबर 2020 आणि दुसरी बैठक 23 डिसेंबर रोजी घेण्यात आली. या बैठकीत कोविड १९ च्या लसीकरण पूर्वतयारीबाबत आढावा व चर्चा करण्यात आली. या मोहिमेत पहिल्या टप्प्यात सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना (शासकीय आरोग्य संस्था, वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र तसेच खाजगी आरोग्य संस्था) यांना लसीकरण करण्यात येईल. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार दुसऱ्या टप्प्यामध्ये इतर संलग्न आजार असलेले रुग्ण व वयोवृद्ध यांचा समावेश करण्यात येईल व तिसऱ्या टप्प्यामध्ये सर्वांचा समावेश करण्यात येईल.
कोविड १९ लसीकरणासाठी पुणे जिल्ह्याकरिता २ हजार ५४६ लस टोचक नेमण्यात येणार आहेत. लसीकरणामध्ये प्रत्येकी २ डोस २८ दिवसांच्या अंतराने देण्यात येणार आहे. लसीच्या साठवणीसाठी १८५ आय.एल.आर. व १५७ डीफ्रीजर आहेत.
‘कोविन’ या कोविड १९ करिता तयार करण्यात आलेल्या पोर्टलबाबत तालुका आरोग्य अधिकारी तसेच तालुकास्तरीय आरोग्य विस्तार अधिकारी, आरोग्य सेवक आणि सर्व वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचे प्रशिक्षण व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे घेण्यात आलेले आहे.
पुणे जिल्ह्यात शासकीय आरोग्य संस्था 253 व खाजगी आरोग्य संस्था 8 हजार 89 अशा एकूण 3 हजार 842 आहेत. शासकीय आरोग्य कर्मचारी 24 हजार 739 व खाजगी आरोग्य कर्मचारी 85 हजार 695 असे एकूण 1 लक्ष 10 हजार 434 आहेत. या सर्व शासकीय व खाजगी संस्था तसेच त्या अंतर्गत येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती ‘कोविन’ या पोर्टलवर भरण्यात येत आहे.
सध्या दैनंदिन 12 हजार ते 13 हजार टेस्ट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात येत आहे. तपासणी प्रमाण वाढवण्याकरिता नियमित रुग्ण सर्वेक्षण, संपर्क व्यक्ती शोध व अधिक लोकसंपर्क असणाऱ्या व्यक्तींचे विशेष सर्वेक्षण चालू आहे. सध्या पुणे जिल्ह्यातील एकूण नमुना तपासणी 18 लक्ष 16 हजार 358 असून बाधित रुग्ण दर 19.7 टक्के आहे. नोव्हेंबर 2020 पासून हा दर 10 टक्के प्रतिदिन प्रमाणे कमी झाला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोविड 19 रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. परंतु, जागतिक स्तरावरील अवलोकन केले असता युरोपमधील अनेक देशांमध्ये कोविड 19 आजाराची दुसरी लाट दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यामध्ये पूर्वतयारी करण्यात आली आहे.
बिल व्यवस्थापन- पुणे जिल्ह्यात रुग्णांच्या देयकातून 7 कोटी 86 लक्ष 97 हजार 944 रुपये लेखा परीक्षणांती कमी करण्यात आलेले आहे. त्यामध्ये पुणे मनपा 2 कोटी 58 लक्ष 43 हजार 262, पिंपरी-चिंचवड मनपा 4 कोटी 20 लक्ष 95 हजार 706 तर पुणे ग्रामीण 1 कोटी 86 लक्ष 97 हजार 944 अशी रक्कम आहे. पुणे जिल्ह्यात लेखा परीक्षण केलेल्या देयकांची संख्या 4 हजार 709 इतकी आहे. त्यामध्ये पुणे मनपा 974, पिंपरी-चिंचवड मनपा 2 हजार 743, पुणे ग्रामीण 992 अशी संख्या आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आज अखेरच्या सर्वाधिक क्रियाशील रुग्णसंख्येच्या अंदाजावरुन 48 हजार 205 पर्यंत रुग्णसंख्या वाढू शकते. त्या परिस्थितीत पुणे जिल्ह्यात पुरेसे मनुष्यबळ, औषध साठा, इंजेक्शन रेमडेसेवीर, बेड संख्या, ऑक्सिजन, अतिदक्षता बेड्स, व व्हेंटीलेटर्स उपलब्ध आहेत.