दैनिक स्थैर्य । दि. १८ एप्रिल २०२२ । मुंबई । माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या ‘लोकराज्य’ या मासिकाच्या मार्च-एप्रिल महिन्याचा ‘तिचा हक्क तिचा गौरव’ या महिला विशेषांकाचे नुकतेच प्रकाशन झाले. महिला विशेष, अर्थसंकल्प 2022-23 ची ओळख व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विशेष विभाग हे या अंकाचे वैशिष्ट्य आहे.
राज्य शासन महिलांसाठी राबवित असलेल्या योजना, महिलांच्या यशकथा हे या अंकाचे आकर्षण आहे. त्याचबरोबर पंचसूत्रीवर आधारीत असलेल्या 2022-23 च्या अर्थसंकल्पातील महत्त्वपूर्ण तरतुदींची माहितीही अंकात समाविष्ट करण्यात आली आहे. 14 एप्रिल ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यानिमित्त अंकात विशेष विभाग समाविष्ट करण्यात आला असून भारतरत्न डॉ.आंबेडकर यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याचबरोबर शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने विशेष मोहीम राबवली आहे. या मोहीमेची माहिती देणारा ‘शासन संवाद’ हा लेख या अंकात समाविष्ट करण्यात आला आहे.
राज्य महिला आयोग, ‘माविम’, विविध पुरस्कार विजेत्या महिला, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आढावा, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प या पुस्तकाचा परिचय आदी विषयांसोबतच ‘मंत्रिमंडळात ठरले’, ‘महत्त्वाच्या घडामोडी’ या नेहमीच्या सदरांचाही अंकात समावेश आहे. हा अंक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच https://mahasamvad.in/?p=65112 या पोर्टलवर वाचण्यासाठी मोफत उपलब्ध आहे.