दैनिक स्थैर्य । दि. १० जानेवारी २०२३ । सातारा । ‘गणित हा विषय रुक्ष आणि समजायला कठीण असला तरी जीवनातच गणित तुमची पाठ सोडत नाही. गणिताचे मिनिमम नॉलेज हे आपल्याला असायलाच हवे. साधी केळी विकणारी बाई असेल तर तिचे गणित देखील चांगले असते. गणिताची आवड निर्माण करणारे शिक्षक असायला हवेतच. आमच्या वेळी १९७८ ला शि.द.फडणीस यांचे पुस्तक आले. तोवर काळा फळा आणि पांढरा खडू यावरच काम चालत होते. गणितातील आकडे अमूर्त असतात.अमूर्त संकल्पना मूर्त केल्याशिवाय गणित समजत नाही. गणित सुंदर आहे हा प्रकल्प सोनम पोवार हिने घेतला असून ‘समजून घेऊया हे पूर्णांक संख्या’ हे तर गणित सोपे करणारे पुस्तक आहे ‘’ असे मत जिजामाता अध्यापिका विद्यालयाच्या माजी प्राचार्या मा.प्रमोदिनी मंडपे यांनी व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेच्या आझाद कॉलेजची माजी विद्यार्थिनी सोनम पोवार हिने लिहिलेल्या ‘समजून घेऊया पूर्णांक संख्या’ या गणित विषयक पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्याडॉ.वंदना जाधव -नलवडे या होत्या.पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी संजय धुमाळ व महाराष्ट्र राज्य प्राथमिक विभाग,पुणे चे शिक्षण उपसंचालक देविदास कुलाळ ,तसेच मा.सुकुमार मंडपे ,प्रा.संभाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. साहित्यवेल प्रकाशनचे प्रकाशक सुमित वाघमारे यांनी समारंभाचे आयोजन केले होते. या पुस्तकाची वैशिष्ट्ये सांगतना त्या म्हणाल्या की ‘’ व्यवहाराशी सांगड घालणारे हे पुस्तक असून खूप उदाहरणे यात दिली आहेत. प्राणी ,कीटक व अगदी मुंग्यांना देखील गणित कळते हा शोध त्यांनी मुलांना समजावून देण्यासाठी
सोप्या भाषेत सांगितला आहे. गणित शिकविण्याच्या इच्छेने स्वतः अभ्यास करून तिने स्वतः वाट शोधलेली आहे. आवड आणि सवड काढून केलेले पुस्तक आहे. रशियन अमेरिकन पुस्तके वाचून संदर्भ त्यांनी दिले आहेत.तसे तर गणित म्हणजे अलीबाबाची गुहा आहे. आपल्याला गणित कळले तरी दुसऱ्याच्या डोक्यात घालणे अवघड असते. पण इथे चित्रांचा चांगला उपयोग केला आहे. हे पुस्तक घरात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला ५-६ वर्षे सतत उपयोगी पडेल. शून्याचा अर्थ,कोडी ,सापशिडी याचा उपयोग करून गणित खेळत शिकावे अशी योजना केली आहे. बालक, पालक व शिक्षक यांना ते वापरता येईल. इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेचा उपयोग करून लिहिलेलेले हे पुस्तक इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यमातील मुलांना उपयोगी ठरेल. आपल्या घरात ग्रंथघर तयार करून अशी पुस्तके त्यात ठेवा असे आवाहन त्यांनी सर्वाना केले.
अध्यक्षीय भाषणात आझाद कॉलेजच्या प्राचार्या डॉ.वंदना जाधव नलवडे म्हणाल्या की’ चांगल्या विचाराने भारलेल्या आमच्या विद्यार्थ्यांचे हे पुस्तक आहे. ताल चांगला असल्याशिवाय गाता येत नाही अन गणित चांगले असल्याशिवाय तालही येत नाही.मला अभिमान वाटतो की ही मुले आझादमध्ये शिकलीत .कर्मवीरांच्या दूरदृष्टीचा लाभ या मुलांना घडतो आहे. गणिताला देखील भाषेचे सौंदर्य त्यांनी निर्माण करून दिले आहे. गणिताची सौंदर्यस्थळे शोधली पाहिजेत, गणितात खेळता आले पाहिजे असे लेखिकेचे मत आहे. माध्यमिकसाठी गणिताचे अनेक संदर्भ आधारे लिहिलेले हे पुस्तक असून ज्ञानरचनावादाचा छान उपयोग करण्यात आला आहे. याने सर्वांचा व्यक्तिमत्व विकास होईल. १५ दिवसांचा कोर्स असावा असे हे पुस्तक पालकांना देखील डोके चालवायला शिकवते.हे पुस्तक विपुल विद्यार्थी घडवेल अशाही त्या म्हणाल्या. प्रास्ताविक व मनोगत व्यक्त करताना लेखिका सोनम पोवार म्हणाल्या की,’आजही गणित शिकणाऱ्या मुलांना संदर्भ
ग्रंथ उपलब्ध होत नाहीत.मराठी ही मातृभाषा आणि इंग्रजी या दोन भाषांचा उपयोग करून स्प्ष्टीकरण दिल्याने सर्वच माध्यमातील मुलांना हे पुस्तक समजेल’’ प्रा.डॉ.अभिमान निमसे यांनी मुले सक्षम करण्यासाठी, भावी भारताचे सुजाण नागरिक घडवण्यासाठी,विद्यार्थ्यांच्यावर चांगले संस्कार होण्यासाठी सोनम पोवार व सुमित वाघमारे सतत प्रयत्न करीत आहेत. आपण पालकांनी आपल्या मुलांशी हसत खेळत संवाद ठेवावा. विद्यार्थ्याला त्याचे ध्येय त्यालाच ठरवू द्यावे. आज पालकांना मुलांशी संवाद साधायला वेळ नाही अशी स्थिती आहे. आपल्या मुलांसाठी वेळ दिला पाहिजे. इतर मुलांशी तुलना न करता त्याला स्वतःला त्याचे भावविश्व समृद्ध करण्यासाठी वातावरण तयार करून
द्यावे असे विचार त्यांनी व्यक्त केले. ‘आजच्या आधुनिक काळात स्वावलंबन म्हणजे अडचणी सोडवण्याचे मार्ग काढणे होय. मुलांना सगळे चमच्याने भरवणे योग्य नाही,त्यासाठी मुलांना स्वतः कृती करायला ,विचार करायला संधी देणे हेच आज महत्वाचे आहे ‘असे सांगत प्रकाशक सुमित वाघमारे यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमास पालक, विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.