मूळप्रश्‍नांना बगल देत देशाला विकून देश चालविण्याचे काम भाजपा करत आहे : नाना पटोले


दैनिक स्थैर्य । दि. १० जानेवारी २०२३ । बारामती । आपल्या भारत देशाची संविधानिक व्यवस्था वाचविणे व जनतेचे मुलभूत प्रश्‍न आज काँग्रेस पक्षासाठी व आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहेत. भाजपने 2014 व 2019 च्या निवडणुकावेळी जी आश्‍वासने जनतेला दिली ती पूर्ण केली नाहीत. मूळप्रश्‍नांना बगल देत देशाला विकून देश चालविण्याचे काम भाजप करत आहे. यामुळे भविष्यात आर्थिक अराजकता निर्माण होतेय की काय अशी परिस्थिती निर्मीण झाली असल्याचे प्रतिपादक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नानाभाऊ पटोले यांनी केले आहे.

बारामती संपादक पत्रकार संघाने पत्रकारांचा सत्कार आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गुरुवारी बारामती दौर्यावर आले होते.

यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नसून, स्वराज्यरक्षक असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्याविरोधात राज्यभर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पालघर येथे औरंगजेबचा उल्लेख औरंगजेबजी असा केला होता, यावरून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट करताना नाना पटोले म्हणाले की, भाजपच्या वतीने सातत्याने महापुरुषांबाबत अवमान केला जात आहे. ज्यांनी या महाराष्ट्राची व्यवस्था वाईट केली त्यांना ’जी’ म्हणायचं. यावरून भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आला असल्याचे पटोले म्हणाले.

सध्याची परिस्थिती इंग्रज राजवटीसारखी
भूक, भय आणि भ्रष्टाचार ही जशी इंग्रजांची मानसिकता होती तीच मानसिकता आज असल्याचे दिसते. आज मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत आहे. शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. जनतेचा पैसा लुटून विशिष्ट लोकांना व मित्रांना वाटण्याचे काम जे केले जात आहे त्यातून भ्रष्टाचार होत आहे. जी काही परिस्थिती आहे ती इंग्रज राजवटीसारखीच आहे ती कुणालाही नाकारता येत नाही, असेही पटोले म्हणाले. जीएसटीमुळे सर्वसामान्यांची लूट सुरू असल्याचे ते म्हणाले.

यावेळी पुरंदरचे आमदार संजय जगताप, माजी आमदार रामहरी रुपनवर, महाराष्ट्र ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

फलटण तालुका वृत्तपत्र संपादक संघाचा सन्मान

या समारंभात लघु व मध्यम वृत्तपत्रांच्या हक्कासाठी राज्यपातळीवर काम करणार्‍या महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघ या संस्थेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या फलटण तालुका वृत्तपत्र संपादक संघाचा सन्मान आ. नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आला.

सदरचा सन्मान तालुका संघाचे अध्यक्ष विशाल शहा, उपाध्यक्ष बापूराव जगताप, सदस्य तथा मार्गदर्शक कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले यांनी स्विकारला.


Back to top button
Don`t copy text!