दैनिक स्थैर्य | दि. १३ मार्च २०२४ | फलटण |
अमरावती या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नाव देण्यावरून झालेल्या वादात बौध्द बांधवांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. त्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया फलटण शहर व तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे. निषेधाचे पत्र आरपीआयच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे देण्यात आले.
या निषेध पत्रात म्हटले आहे की, अमरावतीच्या अंजनगाव सुर्ली तालुक्यातील पांढरी खानमपूर येथील प्रवेशद्वाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीवरून पाच दिवसांपासून अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला सोमवारी सायंकाळी ५ वाजता हिंसक वळण लागले. दोन्ही गटांची संयुक्त बैठक प्रस्ताव अमान्य करत पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या व पाण्याचा वापर केला. आंदोलन करणार्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आली. या लाठीचार्जचा आरपीआय फलटण शहर व तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
प्रशासनाला हे निषेध पत्र देताना आरपीआयचे फलटण शहराध्यक्ष लक्ष्मण अहिवळे, सातारा जिल्हा सचिव विजय येवले, पश्चिम महाराष्ट्र संघटक मधुकर काकडे, सातारा जिल्हा सरचिटणीस मुन्ना शेख, सातारा जिल्हा सदस्य संजय निकाळजे, जिल्हा उपाध्यक्ष राजू मारूडा, फलटण तालुकाध्यक्ष सतीश अहिवळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.