स्थैर्य, औंध, दि. ११ : गोपूज ता.खटाव येथील ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी गोपूज येथील ग्रामस्थ राहूल खराडे हे १५ आँगस्ट रोजी गोपूज ग्रामपंचायतीसमोर निषेध धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती लेखी निवेदनाद्वारे दिली.
याबाबत लेखी निवेदनात दिलेली अधिक माहिती अशी, मागील तीन वर्षापूर्वी गोपूज ग्रामपंचायतीने खाजगी साखर कारखान्याच्या सहकार्याने ग्रामस्थांना पिण्याचे पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे कार्यवाही होऊन गावातील नळकनेक्शन ग्रामस्थांकडून प्रत्येकी पाचशे रुपये घेतले होते. या योजनेमध्ये २२५ कुटुंबाना नळ कनेक्शन ही देण्यात आले. या माध्यमातून पाणी मिळेल अशी आशा ग्रामस्थांना होती मात्र आजही ग्रामस्थांना पूर्वीचाच त्रास सहन करावा लागत आहे. नियमित पाणीही मिळत नाही. यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
मुतखडा, केसगळती, त्वचा विकार, काँलरा असे काही आजार नागरिकांना जडले आहेत. सध्या कोरोनाचा आजार आहे. त्यामध्ये ही मागील सात दिवसांपासून गावचा पाणी पुरवठा बंद आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाशी याबाबत चर्चा करून ही नियमित पाणी पुरवठयाबाबत ठोस आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे शुध्द पाण्याचा प्रश्न सार्वजनिक चर्चेला यावा व ग्रामपंचायत प्रशासनाने यामध्ये लक्ष घालावे यासाठी १५ आँगस्ट स्वातंत्र्यदिनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सनदशीर मार्गाने राहुल खराडे धरणे आंदोलन करणार आहेत. याबाबत योग्य दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा राहुल खराडे यांनी दिला आहे.
कोरोना व लॉकडाऊन मुळे काम लांबणीवर पडले होते, आज काम सुरू करण्यात आले आहे, पाणीपुरवठा व्यवस्थित व सुरळीत होण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील आहे.
उषा महादेव जाधव, सरपंच, ग्रामपंचायत गोपूज