

स्थैर्य, सातारा, दि. ७ जून : पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष प्रा. डॉ. सुनीलकुमार गोरखनाथ पाटील यांना अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षण (Engineering and Technology) क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल डॉक्टरेट (Ph.D.) पदवीने सन्मानित करण्यात आले आहे.
अंबोली (सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) येथे ‘ऑलिम्पियाड एक्झामिनेशन कौन्सिल विद्यापीठा’च्या वतीने आयोजित एका विशेष पदवी वितरण समारंभात गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते प्रा. डॉ. सुनीलकुमार पाटील यांना ही पदवी प्रदान करण्यात आली.
या सोहळ्याला ऑलिम्पियाड एक्झामिनेशन कौन्सिलचे कुलगुरू डॉ. आचार्य जगदीश सो, प्रमुख पाहुणे अरविंद परिशेट्टी, डॉ. अनिलराव कुराडे, संचालिका सौ. संगीता पाटील आणि प्राचार्य सुजित पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या समारंभात उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून प्रा. डॉ. सुनीलकुमार पाटील यांच्या शैक्षणिक आणि तांत्रिक क्षेत्रातील प्रदीर्घ कार्याचा व योगदानाचा गौरव केला. डॉक्टरेट पदवी प्राप्त केल्याबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
