किरण माने प्रकरणाला आता वेगळे वळणं; गैरवर्तनामुळे माने यांना मालिकेतून काढल्याचा प्रॉडक्शन हाऊसचा खुलासा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१६ जानेवारी २०२२ । सातारा । किरण माने यांना त्यांच्या वर्तणुकीमुळे तिनवेळा वाॅर्निंग देऊन मग सिरियलमधून काढण्यात आले. परंतु त्यांनी त्याचा राजकीय स्टंट केल्याचा आरोप ‘मुलगी झाली हो’ या मालिकेचे लाइन प्रोड्युसर सचिन ससाने यांनी केला आहे. किरण माने यांच्या स्टंटमुळे गावातील आणि जिल्ह्यातील शुटींगसाठीचे वातावरण गढूळ झाले आहे. शुटींगमुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो. असे असताना कित्येकांच्या पोटावर पाय आणण्यासाठी किंवा आपल्याकडे शुटींगच येऊ नयेत, असा पध्दतीने राजकीय पोष्ट करुन दबाव निर्माण केला आहे. पण यात काही तथ्य नाही. चुकीच्या धोरणामुळे किरण माने यांना तिनवेळा वाॅर्निंग देऊन मग त्यांना काढले आहे, असा खुलासा सचिन ससाने यांनी केला आहे.

सोशल मिडीयावर राजकीय पोस्ट केल्याने ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून काढून टाकल्याचा आरोप अभिनेता किरण माने यांनी केला आहे. हे प्रकरण सध्या चांगलच गाजत आहे. वाई तालुक्यातील गुळुंब ग्रामपंचायती अंतर्गत मयुरेश्वर गावात या मालिकेचे चित्रीकरण सुरु आहे. गुळुंब गावच्या सरपंचांनी चित्रीकरणाची परवानगी रद्द केल्याचे पत्र व्हायरल केले असले तरी आज या मालिकेचे चित्रीकरण सुरु होते.

सरपंचांचे पत्र

गुळुंब ग्रामपंचायतीच्या सरपंच स्वाती शिवाजी माने यांनी किरण माने प्रकरणात एक पत्र व्हायरल करत उडी घेतली आहे. या पत्रात त्या म्हणतात राजकीय भुमिका मांडणाऱ्या मराठी कलावंताला मालिकेतुन काढल्याबद्दल मराठी चित्रपटसृष्टीचा जाहिर निषेध. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कुऱ्हाड चालवणाऱ्या स्टार प्रवाह वहिनी व मुलगी झाली हो या मालिकेची संपूर्ण टीम ने हे विसरू नये. अजुन ही महाराष्ट्रात शिव, शंभू शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर चालणारी लोकशाही नांदते. अशा मनुवादी विचारसरणीच्या स्टार प्रवाह वहिनी व मुलगी झाली हो मालिकेच्या टीमचे आमच्या गावी होत असलेल्या चित्रीकरणाला ग्रामपंचायत गुळुब तालुका वाई जिल्हा सातारा मान्यता नाकारत आहे. अशा प्रवृत्तीला इथून पुढे आमच्या हद्दीत प्रवेश नाही, असे या पत्रात नमुद केले आहे.

गुळुंब गावच्या सरपंचांचे चित्रीकरणाला मान्यता रद्द असे सांगणारे पत्र व्हायरल झाले असले तरी त्यांचा मोबाइल फोन काल रात्रीपासून बंद आहे. त्यांच्या गावीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. गावात ग्रामपंचायतीचा कोणीही पदाधिकारी या प्रकरणावर बोलायला तयार नाही.


Back to top button
Don`t copy text!