व्यावसायिक अभ्यासक्रम ही काळाची गरज : श्रीमंत संजीवराजे


दैनिक स्थैर्य । दि.१६ जानेवारी २०२२ । फलटण । आजच्या स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रम ही काळाची गरज आहे. मुधोजी महाविद्यालयामार्फत सुरू करण्यात आलेल्या ‘कंपनी सेक्रेटरी’ या अभ्यास केंद्राला शुभेच्छा देत महाविद्यालयाचे व वाणिज्य विभागाचे अभिनंदन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

मुधोजी महाविद्यालयातील वाणिज्य विभाग व द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (आय. सी. एस. आय.) कोल्हापूर यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार (MOU) झाला. या कराराच्या अनुषंगाने महाविद्यालयामध्ये ‘कंपनी सेक्रेटरी’ या अभ्यास केंद्राचे उद्घाटन फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते झाले.

आय. सी. एस. आय. कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष अमित पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना कंपनी सेक्रेटरी कोर्सची सविस्तर माहिती देऊन, हा कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या नोकरीच्या विविध संधींची सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना ‘कंपनी सेक्रेटरी’ या कोर्स साठी जास्तीत जास्त संख्येने प्रवेश घेण्याचे आवाहन करून आजच्या स्पर्धेच्या युगात नोकरीच्या दृष्टीने स्वतःचे भक्कम स्थान निर्माण करणे कसे गरजेचे आहे, याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा परिचय वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. ज्योत्स्ना बोराटे यांनी करून दिला.

याप्रसंगी कोल्हापूर विभागाच्या सी. एस. ऑफिस इन्चार्ज सौ. राजश्री लांबे, रिया कारेकर, सी. एस. अजित निंबाळकर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्र-संचालन प्रा. डॉ. अशोक शिंदे यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!