निंभोरे दुहेरी खुनाच्या गुन्ह्याचा १० तासांच्या आत उलगडा; आरोपीस अटक

फलटण ग्रामीण पोलिसांचे यश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २५ मे २०२४ | फलटण |
निंभोरे (ता. फलटण) गावच्या हद्दीत दि. २५ मे रोजी झालेल्या दुहेरी खून प्रकरणातील आरोपीस पोलिसांनी तातडीने तपास करून १० तासांच्या आत अटक केली आहे.

रणजित मोहन फाळके (सध्या रा. निंभोरे, ता. फलटण, मूळगाव सातारारोड, ता. कोरेगाव, जि. सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

निंभोरे, ता. फलटण गावच्या हद्दीत पालखी महामार्गाजवळ दि. २५ मे रोजी सकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास सुमित तुकाराम शिंदे (वय २०) व शीतल तुकाराम शिंदे उर्फ शीतल रणजित फाळके (वय ३५, दोघे रा. सुंदरनगर, निंभोरे, ता. फलटण) यांचे मृतदेह रस्त्याच्या कडेला सापडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता दोघांच्या छातीवर धारदार व टोकदार भोकसल्यामुळे त्यातून रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आले. सदर घटनेतील दोन्ही मृत व्यक्ती या नात्याने सख्खे बहीणभाऊ आहेत. त्या दोघांचा खून अज्ञात व्यक्तीने केला म्हणून फलटण ग्रामीण पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण राहुल धस यांनी स्थागुशा साताराचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस निरीक्षक फलटण ग्रामीण पोलीस ठाणे सुनिल महाडीक यांच्या नेतृत्वाखाली तपास पथके तयार करून मार्गदर्शन करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार निंभोरे, ता. फलटण हे गाव पुणे-पंढरपूर पालखी महामार्गालगत असून सदर घटनेचे ठिकाणदेखील या महामार्गावरील उड्डाणपुलाजवळ आहे. घटनास्थळावर काहीही धागेधोरे नसताना पोलिसांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केल्यानंतर असे निष्पन्न झाले की, मयत स्त्री शीतल तुकाराम शिंदे उर्फ शीतल रणजित फाळके हिने दोन वर्षांपूर्वी तिचा पहिला नवरा कनवर्‍या भिमर्‍या पवार, रा. वाळवा, जि. सांगली यास सोडून देऊन रणजित मोहन फाळके, मूळगाव सातारारोड, ता. कोरेगाव, जि. सातारा याच्याबरोबर तिच्या आई-वडिलांजवळ झोपडीमध्ये राहत होती.

ही घटना घडलेल्या रात्रीसुद्धा रणजित मोहन फाळके हा तिच्यासोबत झोपडीमध्ये झोपला होता; परंतु दोघांचे मृतदेह मिळून आल्यानंतर त्याने तेथून पलायन केले होते. पोलिसांनी त्यास सातारारोड, ता. कोरेगाव येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता, त्याने सुरूवातीला दिशाभूल करणारी माहिती सांगितली; परंतु पोलिसी खाक्या दाखवताच त्याने दि. २५ एप्रिल २०२४ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शीतल ही झोपेतून उठून परपुरूषाबरोबर कोठेतरी जात असल्याचे दिसल्यामुळे तो झोपडीतील चाकू घेऊन तिच्या मागोमाग गेला. काही अंतरावर गेल्यानंतर त्याने शीतलला गाठून तिच्या छातीवर चाकू खुपसून तिचा खून केला. त्यावेळी तिच्यासोबत असलेला तिचा भाऊ सुमित तुकाराम शिंदे यास त्याने अंधारात न ओळखल्यामुळे त्याने तो परपुरूष आहे, असे समजून त्याने त्याच्याही छातीत चाकू खुपसून त्याचाही निर्घृण खून केला आहे.

या खून प्रकरणी आरोपी रणजित मोहन फाळके (वय ४५) यास पोलिसांनी अटक केली आहे. तपासामध्ये मयत बहीणभाऊ हे अनुसूचित जमाती या प्रवर्गातील असल्याचे व आरोपी रणजित मोहन फाळके हा खुल्या प्रवर्गातील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील कलमांची वाढ केली आहे.

अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थागुशा सातारा, सुनिल महाडीक पोलीस निरीक्षक फलटण ग्रामीण, सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट, अशोक हुलगे, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, मच्छिंद्र पाटील, गोपाल बदने, पोलीस अंमलदार मोहन हांगे, पांडुरंग हजारे, बबन साबळे, महादेव पिसे, संतोष सपकाळ, प्रविण फडतरे, अजित कर्णे, अरुन पाटील, शिवाजी भिसे, अमित माने, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, ओंकार यादव, मोहन पवार, रोहित निकम, विशाल पवार, वैभव सावंत, केतन शिंदे, शिवाजी गुरव, अमृत कर्पे, वैभव सूर्यवंशी, नितीन चतुरे, संदीप मदने, अमोल जगदाळे, विक्रम बनकर, श्रीनाथ कदम, अमोल पवार, संजय देशमुख, अमोल देशमुख, संभाजी साळुंखे, विक्रम कुंभार, हनुमंत दडस, रशिदा पठाण, प्रिती काकडे, उर्मिला पेंदाम, भाग्यश्री सुरुम, श्रीकांत खरात, अरुधंती कर्णे, शिवराज जाधव सदरची कारवाई केली आहे.

गुन्ह्याचा प्राथमिक तपास पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांनी केला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस हे करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!