
थेट WhatsApp वर मिळवा
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. रस्त्यांच्या कामात कमिशन घेतले जात असून कुंभमेळ्याचे ३५ हजार कोटी दुष्काळग्रस्तांना द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
स्थैर्य, सातारा, दि. १९ ऑक्टोबर : शिक्षणाकडे दुर्लक्ष करून केवळ ४० टक्के कमिशन मिळवण्यासाठी रस्ते बांधले जात आहेत. तसेच, नाशिक कुंभमेळ्यासाठी खर्च होणारे ३५ हजार कोटी रुपये राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना द्यावेत, अशी आक्रमक मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली. केंद्र सरकारवरही त्यांनी निवडणुका फिक्स करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
लोकशाही संपवण्याचे कारस्थान
निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवरून चव्हाण यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. मोदी सरकार युवकांच्या आंदोलनाला आणि विरोधी पक्षांच्या एकजुटीला घाबरले आहे. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निवडणुका मॅनेज केल्या जात आहेत. पक्षांची फोडाफोडी करून ५०-५० कोटी रुपयांचा व्यवहार होत आहे. पैशांच्या जोरावर सुरू असलेल्या या राजकारणामुळे लोकशाही संपवण्याचे कारस्थान सुरू असल्याचे चव्हाण यावेळी म्हणाले.
कुंभमेळ्याचा निधी दुष्काळग्रस्तांना द्या
मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासह अनेक भागांत भीषण दुष्काळ असताना शासन नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटी रुपये खर्च करण्याच्या तयारीत आहे. हा खर्च थांबवून तो निधी राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना द्यावा. लोकांना विश्वासात न घेता आणि स्थानिक घरे, रुग्णालये उद्ध्वस्त करून केवळ राजकीय फायद्यासाठी पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.





