कृषीपूरक अभ्यासक्रम सुरु करण्यास प्राधान्य द्यावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


दैनिक स्थैर्य । दि. २७ मे २०२३ । रत्नागिरी । महाराष्ट्र राज्य हे कृषीप्रधान राज्य आहे. शेतकऱ्यांचे जीवन सुखकारक करण्यास राज्य शासनाचे प्राधान्य आहे. शासकीय तंत्रनिकेतन परिसरात कौशल्य विकास केंद्रामार्फत सुमारे  20 विविध अभ्यासक्रम राबविले जातात. कृषी पूरक अभ्यासक्रम सुरु करण्याला या केंद्राने प्राधान्य द्यावे, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्यावतीने शासकीय तंत्रनिकेतन संस्थेच्या परिसरात निर्माण करण्यात आलेल्या कौशल्य विकास केंद्राचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, कृषी मंत्री दादाजी भुसे हे होते.

अर्धा एकर परिसरात केवळ 7 महिन्यांत उभारण्यात आलेल्या या इमारतीच्या बांधकामाचे कौतुक करुन मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राज्यातील विद्यार्थी, युवकांसाठी उद्योगधंद्यांच्या गरजेनुसार विविध व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम राबविण्याचे शासनाचे धोरण आहे. या केंद्रातून अनेक गुणवंत विद्यार्थी निर्माण होतील, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्रारंभी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक प्रमोद नाईक यांनी संस्थेच्या विविध अभ्यासक्रम व उपक्रमाबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अत्यंत आत्मियतेने उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थिनींशी संवाद साधला.

याप्रसंगी शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य औदुंबर जाधव, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरज खंते, कौशल्य विकास केंद्राच्या प्राचार्य गौरीनंदा सावंत, कौशल्य विकास केंद्राचे अभ्यास प्रमुख  अक्षय पाटील यांच्यासह इतर प्राध्यापक, शिक्षकेतर वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.


Back to top button
Don`t copy text!