“चैतन्याच्या मोहरांतून बालकुमारांत संस्कारांची पेरणी” – प्राचार्य, सुनील दबडे


दैनिक स्थैर्य । दि. ३१ ऑगस्ट २०२२ । आटपाडी । कळत – नकळतपणे मुलांवर जे जे चांगले ठसविले जाते , ते ते संस्कारांत मोडते . संस्कार मोठ्यांच्या आचरणांतून बालकांमध्ये झिरपत झिरपत जातात . संस्कारांतून संस्कृत्ती घडते . संस्कृत्तीतून राष्ट्राची उभारणी होते.

समाजामध्ये बालकांमध्ये मोठ्यांच्या आचरणातून दिले गेलेले संस्कार समाज घडणी साठी केव्हाही चांगलेच ..! आज समाजांमध्ये विविध ठिकाणी संस्कार केंद्रांमार्फत बालकुमारांवर संस्कार केले जात आहेत . घरांघरांत आणि शाळां शाळांत बालकुमारांवर संस्कार केले जात आहेत . वाचन, भजन , किर्तन , प्रवचन , व्याख्याने तसेच अशा विविध माध्यमांतून बालकुमारांत संस्कार ठसविले जात आहेत .
बालकुमारांमध्ये संस्कारांची पेरणी करण्यात कवी / लेखकही मागे नाहीत . अनेक लेखक बालकुमारांसाठी चांगले लेखन करून त्यांच्यामध्ये संस्कारांची पेरणी करीत आहेत . हे चित्र खुपच आशादायक आहे . यामध्ये खास बालकुमारांसाठी लेखक डॉ . रविंद्र कानडजे यांनी ” चैतन्याचा मोहर ” . हा कथासंग्रह लिहीला आहे . या पुस्तकातून बालकुमारांमध्ये संस्कारांची पेरणी करण्याचा डॉ . कानडजे यांचा प्रयत्न आहे.

हे पुस्तक राजुरा ( बु.) , मुखेड , जि . नांदेड येथील गणगोत प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आले आहे . पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ बालकुमारांना आकर्षित करणारे आहे . मुखपृष्ठावर बालकुमारांचे व निसर्गाचे मनमोहक चित्र आहे . मलपृष्ठावर अशोक कोळी यांनी पुस्तकाबद्दल चांगला अभिप्राय लिहीला आहे . पुस्तकाची किंमत ७५ रुपये आहे.

पुस्तकाचे लेखक उच्चशिक्षीत असून सध्या ते यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे तहसिलदार म्हणून कार्यरत आहेत . सुरुवातीला त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले आहे . त्यांचा मूळचा पिंड शिक्षकाचा असल्यामुळे त्यांना बालकुमारांच्या तसेच तरुणांच्या मानसिकतेचं खुप
चांगलं आकलन आहे. बालकुमारांना ग्रामीण जीवनाची ओळख व्हावी व त्यांच्यामध्ये विविध मूल्यांची रुजवणूक व्हावी म्हणून हे पुस्तक लिहीले असल्याचे मत डॉ. कानडजे यांनी या पुस्तकातील आपल्या मनोगतात व्यक्त केले आहे.

या पुस्तकांमध्ये एकूण १३ कथा आहेत . सर्वच कथांतून ग्रामीण जीवनाची ओळख करून देण्यात आली आहे . खेड्यांतील शेती माती , डोंगर कडा , ओढे , झाडी पशु पक्षी , घरे, घरांतील कर्ती माणसे , पाळीव प्राणी यांचे वर्णन या पुस्तकांतून करण्यात आले आहे . लेखनाची भाषा सरळ साधी सोपी असून ती बालकुमारांना समजेल अशी आहे . खेड्यांबद्दल प्रेम निर्माण करणाऱ्या या कथा आहेत . प्रेमभाव हे या सर्वच कथांचे केंद्र आहे . स्वावलंबन, थोरामोठ्यांचा आदर , पशुपक्षी प्राण्यांबदल प्रेम , एकूणच निसर्गाबद्दल प्रेम , शिक्षणाचे महत्व , निकोप कुटुंब व्यवस्था , देशभक्ती आदी विविध मूल्यांची शिकवण पुस्तकातील प्रत्येक कथेतून दिसून येते .
आजच्या अस्वस्थ समाज व्यवस्थेच्या काळात ” चैतन्याचा मोहर ” . या पुस्तकासारखी अधिकाधिक पुस्तकांचे लेखन लेखकांच्य हातून होणे ते बालकुमारांपर्यंत पोहचविणे , त्या पुस्तकांचे पारायण करणे हे खुपच गरजेचे आहे.
आज घरांघरांतील संवाद कमी होत चालले आहेत . मोबाईलच्या विळख्यात घरं सापडली आहेत . सुसंवाद संपून वाद वाढत आहेत . अनेक घरं, घरातली पोरं बरबादीच्या मार्गावर आहेत . अशा घरातील बालकुमार तोंड मिटून, हाताची घडी घालून घरातल्या या सगळ्यांकडे पाहत आहे . बालकुमारांचे बालपण हरवत आहे . घरपण संपत चालले आहे . अशावेळी बिघडलेली ही व्यवस्था बालकुमारांच्या हातांत पुस्तके देऊन, पुस्तकांचे वाचन करून नीट करता येऊ शकते . पुस्तके विकत घेऊन त्या पुस्तकांचे आधी घरांघरांतील जाणत्यांनी वाचन करणे आवश्यक आहे . अशा पार्श्वभूमीवर डॉ. रविंद्र कानडजे यांनी बालकुमारांसाठी केलेला प्रयत्न खुपच कौतुकास्पद आहे.

अनेक कुटुंबे आपलं घरपण टिकवून आहेत . विविध माध्यमांतून बालकुमारांत संस्कार केले जात आहेत . पण हे प्रयत्न अधिकाधिक वाढणे आवश्यक आहेत.

जपान आणि रशिया या देशांनी आपापल्या देशांत नाविन्यपूर्ण प्रयोग केला होता . त्या देशांनी बालकुमारांसाठी उपयुक्त ठरणारी पुस्तके तेथील साहित्यिकांना लिहायला सांगितली होती . साहित्यिकांना सर्वतोपरी सहकार्य करून लेखनासाठी प्रोत्साहन दिले होते . मग साहित्यिकांनी बालकुमारांसाठी लेखन केले . ही पुस्तके बालकुमारांच्या हाती देण्यात आली पुस्तकांचे पारायण झाले . वीस वर्षानंतर सर्व्हे झाला . अनेक प्राध्यापक, इंजिनिअर, डॉक्टर , वकील घडले . पण माणूस घडण्यासाठी या पुस्तकांचा खुपच चांगला उपयोग झाल्याचे सव्हेअंती दिसून आले . आपल्या महाराष्ट्रात आणि देशात असा प्रयोग झाला तर किती बरे होईल .. असो … :
आपले साहित्यिक समाजसेवेचे हे काम बिन बोभाटपणे करीत आहेत . डॉ . कानडजे यांचे बालकुमारांसाठीचे प्रामाणिक प्रयत्न असेच वाढत राहोत . त्यांच्याहातून दर्जेदार लेखन होवो . या शुभेच्छा …. !


Back to top button
Don`t copy text!