स्थैर्य, वाराणसी, दि.३०: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज
स्वतःच्या वाराणसी मतदारसंघात आहेत. या दौऱ्यावेळी त्यांनी
प्रयागराज-वाराणसी 6 पदरी महामार्गाचे लोकार्पण केले. यानंतर सभेत शेतकरी
आंदोलनावर बोलताना ते म्हणाले की, MSP आणि युरियाच्या नावावर शेतकऱ्यांचा
छळ करणारे आता कृषी कायद्यांबाबत भीती पसरवत आहेत. जे कधी होणार नाही
त्याबद्दल संभ्रम पसरविला जात आहे.
मी
वाराणसीच्या पवित्र भूमिवरून सांगू इच्छितो की, आता कट कारस्थान करुन
नाही, तर गंगेच्या निर्मळ पाण्याप्रमाणे काम केले जात आहे. भ्रम
पसरवणाऱ्यांचे सत्य देशासमोर येत आहे. आज ज्या शेतकऱ्यांना कृषी
कायद्यांबाबत शंका आहे, ते देखील भविष्यात याचा लाभ घेतील. जर जुन्या
यंत्रणेद्वारे व्यवहार योग्य समजला जात असेल तर त्यावर कोणतेही बंधन नाही.
नवीन कायदा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. यामध्ये शेतकऱ्यांना स्वातंत्र्य
देण्यात आले आहे.
जे घडले नाही त्याबद्दल संभ्रम निर्माण केला जात आहे
मोदी
म्हणाले की, सरकारने एखादा कायदा तयार केला तर त्याला पाठिंबा व विरोध
दोन्ही केले जाते. पूर्वी सरकारचा निर्णय कोणालाही आवडायचा नाही, त्याला
विरोध व्हायचा. आता प्रचार केला जातो की, निर्णय योग्य आहे. पण पुढे चालून
काय होईल हे सांगता येणार नाही. जे होणारच नाही त्याबद्दल समाजात संभ्रम
निर्माण केला जात आहे. 24X7 त्यांचे हेच काम आहे. असे म्हणत मोदींनी
विरोधांवर टीका केली.
विरोध करणाऱ्यांनी शेतकऱ्यांचा छळ केला
मोदींनी
नवीन कायद्याच्या विरोधावर म्हटले की, हे तेच लोक आहेत ज्यांनी दशकांपासून
शेतकऱ्यांचा छळ केला. आधी MSP च्या नावावर छळ केला. लहान आणि सीमांत
शेतकर्यांना फायदा होत नव्हता. कर्जमाफीच्या नावावर छळ केला गेला.
शेतकर्यांच्या
नावे मोठ्या योजना बनविल्या गेल्या, पण 15 पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात
असे ते मानायचे. अनेक अनुदान देण्यात आले. पण त्यातही घोटाळे व्हायचे.
शेतकर्यांना उत्पादकता वाढविण्यास सांगितले. एखाद्याची उत्पादनक्षमता
दुसर्या एखाद्यासाठी सुनिश्चित केली गेली.
मोदींनी पीक खरेदीची माहिती दिली
यावेळी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीक खरेदीची आकडेवारी सांगितली. ते म्हणाले की
2014च्या पाच वर्षांमध्ये संपूर्ण देशात 650 कोटींची डाळ खरेदी केली.
आमच्या पाच वर्षांच्या काळात 49 हजार कोटींच्या डाळी MSPवर खरेदी केल्या.
यामध्ये 75 पटीने वाढ आहे. आधीच्या सरकारने MSP वर 2 लाख कोटींचे धान्य
खरेदी केले, आम्ही MSP द्वारे 5 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले.
काँग्रेस सरकारने पाच वर्षांत MSP च्या आधारावर 1.5 लाख कोटींचा गहू खरेदी
केला, तर आम्ही 3 लाख कोटींचा गहू खरेदी केला. जर मंडी संपवायच्या असत्या
तर मग आम्ही त्यांना एवढे मजबूत का केले?